महाबळेश्वर (प्रतिनिधी ) : महाबळेश्वर शहरात सध्या एकच पेट्रोल पंप नागरिकांच्या सेवार्थ असून पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असतात. पर्यटन हंगाम सुरू असताना पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवतो. रस्त्यामध्ये अनेकदा वाहनांचे इंधन संपले असल्याने वाहने रस्त्याच्या कडेला उभी असलेली पाहावयास मिळतात. अशावेळी कॅनमधून इंधन मिळवून पुढचा प्रवास करावा लागतो. परंतु आता नागरिकांच्या गाडीचे इंधन संपले असताना कॅन मध्ये पेट्रोल व डिझेल घेण्यासाठी पोलीस स्टेशन मधून पोलिसांचे परवानगी असलेले पत्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना दाखवल्यानंतरच पेट्रोल व डिझेल मिळणार. या अनोख्या नियमाने नागरिक पुरतेच हैराण झालेले आहेत. जर तुमच्या गाडीतील इंधन संपले तर कॅन मध्ये इंधन मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर आल्यानंतर पंप चालक नागरिकांना पोलीस स्टेशन चा रस्ता दाखवत आहेत. पंपापासून पोलीस स्टेशन पर्यंत पायपीट करून आल्यानंतर पोलीस अर्ज आणण्यासाठी झेरॉक्स दुकानाचा पत्ता सांगतात. झेरॉक्स दुकानातून अर्ज आणल्यानंतर पोलीस त्याच्यावर सही शिक्का करून तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल घेण्यासाठी परवानगी देतात. ते परवानगी पत्र घेऊन पंप वाल्यांना दाखवल्यानंतर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल मिळते.
संबंधित प्रकाराची विचारणा पोलीस स्टेशनमध्ये केली असता सध्या राज्यपाल दौरा सुरू असल्याकारणाने महाबळेश्वर पोलीस निरीक्षकांनी हा नियम लागू केल्याचे सांगण्यात आले. परंतु या नियमामुळे सामान्य नागरिकांना किती त्रास होत आहे याचा विचार कोण करणार ? दरसाला प्रमाणे मे महिन्यात राज्यपालांचा दौरा महाबळेश्वर येथे असतोच परंतु यापूर्वी असा नियम कधीच महाबळेश्वर मध्ये लागू करण्यात आला नव्हता. नव्याने रुजू झालेल्या महाबळेश्वर पोलीस निरीक्षकांच्या या अनोख्या नियमामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून नागरिकांबरोबरच पर्यटक सुद्धा पुरतेच हैराण झालेले आहेत.