महाबळेश्वर :- येथील श्रीराम विठ्ठल मंदिरात कार्तिक मासानिमित्त कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतचा काकड आरती सोहळा सुरू असून मंदिरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. पहाटे पहाटेच टाळ मृदंगाच्या साथीने विठ्ठल भक्त हरिनामात दंग होत आहेत. गेली सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील काकड आरतीची परंपरा महाबळेश्वर वासियां कडून अखंडपणे सुरू ठेवली आहे.
दररोजची काकड आरतीमध्ये श्री राम विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या नियमाप्रमाणे शहरातील ईच्छूक भाविकांना आरतीचा मान दिला जातो. पहाटे मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी देवीच्या मूर्तीस लोणी लावून सुगंधी उटणे तसेच दही, दूध, साखर, मध, तूप व गरम पाण्याने देवाला स्नान घालण्यात येते तसेच अभिषेक पूजा व नैवेद्य इत्यादी धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने सुरू असतात. अतिशय उत्साही व भक्ती भावाने सुरू असलेल्या या सोहळ्यास शहरातील भावीकांसह विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय आहे.
काकड आरती सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी माऊली भजनी मंडळाचे प्रभाकर देवकर,बाबाजी आखाडे, किसन खामकर, विश्वजीत कदम (बंटी) सुरेश सपकाळ, दत्ता सुतार, नितीन चौरसिया, शिरिष गांधी, शाम जेधे,बुधाजी सुतार,शिवाजी खंडझोडे, मनोहर धोत्रे, श्रीकांत जाधव, राजेंद्र पवार तसेच महिला वर्गात मंगल शेटे, विमलताई पार्टे, माधुरी धोत्रे,निलम धोत्रे,रतन उगले, उषाताई ओंबळे हे परिश्रम घेतात.
तसेच श्री राम विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त दिलीप शिपटे, नितीन चौरसिया, रतिकांत तोषणिवाल, अशोक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभते.नित्यनेमाचे धार्मिक विधी चे पौरोहित्य शरद जंगम (मोळेश्वर) हे करतात तर त्यांना सहकार्य वसंत जंगम करतात