म्हसवड : सातारा-म्हसवड-पंढरपूर या केंद्रीय महामार्गासाठी रस्त्यालगतच्या घेतलेल्या जमिनीची भरपाई द्यावी, या मागणीसाठी म्हसवडपासून सात किलो मीटर अंतरावरील धुळदेव येथील शेतकऱ्यांनी हा महामार्ग अडवून रस्ता बंद केल्याची घटना आज घडली.
सातारा-म्हसवड-पंढरपूर हा रस्ता पूर्वी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. केंद्र सरकारने तो ताब्यात घेऊन या रस्त्याचे रुंदीकरणासह सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरु केली. या रस्त्याची पुर्नबांधणी करताना रस्त्यालगतच्या शेतकरी बांधवांच्या जमिनी या रस्त्यात घेतल्या गेल्या.
परंतु, त्या जमिनीची केंद्र सरकारने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामुळे धुळदेव ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे बांधकाम करु दिले नाही. परिणामी, या रस्त्यावर खोल खड्डे पडून वेळोवेळी वाहनांचे अपघात होण्याच्या घटना वाढीस लागल्या, याबरोबरच अनेकांना अपघातात प्राण गमवावे लागले. जखमींची संख्या वाढू लागल्यामुळे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे संबंधित ठेकेदारांनी सुरु करण्याच्या हालचाली दिसून येताच येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर आडवा दोरखंड बांधून हा रस्ता वाहतुकीस बंद केला.
प्रारंभी या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या, नंतर संबंधित वाहन चालकांनी माळरानातून वाहने चालवत नेत पुढील काही अंतरावरील खुल्या रस्त्यावरुन पुढे मार्गस्थ झाली. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरु होते. शासनाने आमच्या जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी संबंधित रस्ताबाधित जमीनधारक शेतक-यांची होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलन मागे घेऊन रस्ता वाहतुकीस खुला करण्याबाबत प्रयत्न करीत होते.