महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार…खासदार उदयनराजें

0

सातारा : विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार असून, सातारा-जावळीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्यात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान, बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामच केलेले आहे. युगेंद्र पवार यांनी आयुष्य परदेशात काढले असून, कोणाला तरी उभे करावे, म्हणून त्यांना उभे केले आहे. त्यांचा बळीचा बकरा केला आहे, अशी टीकाही त्यांनी बारामतीच्या लढतीवर केली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब येथील अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासमवेत राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले उपस्थित होते.
मतदानानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. खासदार उदयनराजे म्हणाले, ”अजित पवार यांनी बारामतीत काम केले आहे. युगेंद्र पवार यांनी आयुष्य परदेशात काढले. त्यांनी तसेच राहावे. ज्यावेळेस काम करायचे त्यावेळेस केले नाही. अजितदादांनी तेथे काम केलेले आहे. निवडणुकीच्या काळात हौसे, नवसे, गवसे असतात. त्याप्रमाणे कोणतरी म्हणते म्हणून उभे केले जाते. पवारसाहेब म्हणत होते, कोण नाही तिथे; पण युगेंद्र पवार यांना बळीचा बकरा केला आहे.” निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेत येणार असून, सातारा-जावळीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्यात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले.

बदनाम करण्याचा प्रकार

भाजपचे नेते विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, ”असे काही घडलेले नाही. हे सर्व दाखवले जाते. हे नियोजनबद्ध बदनाम करण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत लेाकांपुढे जाताना आपल्याकडे कोणतेही सांगण्यासारखे काम नसते. त्यावेळी चारित्र्यहनन केले जात आहे. हा सर्व नियोजनबद्ध प्रकार आहे.” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here