गोंदवले -: महिमानगड ता. माण (दहिवडी) जि. सातारा येथील शिवकालीन महिमानगड किल्ल्याची डिसेंबरमध्ये पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडून पाहणी करण्यात येणार आहे. अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांनी सहाय्यक संचालक विलास वाहणे यांची भेट घेऊन किल्ल्याच्या संवर्धनाबाबत चर्चा केली.
शिवकालीन महिमानगड किल्ल्याचे संवर्धन व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन संचालनालय, पुरातत्व पुणे विभागाच्या सहाय्यक संचालकांना याबाबत कळविले होते. अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ यांच्याकडून याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
शिवकालीन मुख्य किल्ल्यापैकी एक असलेल्या व राज्य शासनाकडून बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या महिमानगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा व पर्यटन केंद्र म्हणून हा किल्ला विकसित व्हावा. यासाठी भरीव निधी राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अमोल एकळ यांनी राज्य शासनाकडे केली आहे. सातारा जिल्हा नियोजन समितीनेही याबाबत पर्यटन संचालनालय पुरातत्व विभागाच्या पुणे येथील सहाय्यक संचालकांना कळवले. त्यानंतर अमोल एकळ यांनी प्रत्यक्ष पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली. त्यानुसार या किल्ल्याची पाहणी आता डिसेंबरमध्ये होणार आहे.