सातारा / प्रतिनिधी : येथील राजसपुरा पेठेतील ज्येष्ठ नागरिक व मुस्लिम समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शिका श्रीमती खुर्शीद बशीरभाई शेख (वय 82) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी दुःखद निधन झाले. माजी नगराध्यक्ष नासिरभाई शेख, पोलीस कर्मचारी राजूभाई उर्फ लियाकत व शौकत शेख यांच्या त्या मातोश्री होत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
गुरुवार दि. 21 रोजी सायंकाळी चार वाजता तालीम संघानजिकच्या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. नासिरभाई व त्यांच्या पत्नीच्या सामाजिक, राजकीय प्रगतीमध्ये, तसेच शेख कुटुंबासह नातेवाईकांच्या सर्वांगीण विकासामध्येही त्यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा होता. त्या मनमिळावू स्वभावाच्या व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध मान्यवरांनी मातोश्रींच्या निधनाबद्दल नासिरभाई शेख व कुटुंबियांचे सांत्वन केले.