सातारा/अनिल वीर : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांनी केलेल्या प्रवास वर्णनाचे ‘माझा आगबोट प्रवास’ या नावाने विख्यात समीक्षक डॉ. अनंत देशमुख यांनी संपादन केले असून याचे प्रकाशन रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी पुण्यात होत आहे.
सायंकाळी साडेपाच वाजता नवी पेठेत पत्रकार भवनमध्ये साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते हा सोहळा होईल. पुणे विभागाचे सहधर्मादायआयुक्त सुधीरकुमार बुके अध्यक्षस्थानी आहेत.
सातार्यातील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहर प्रतिनिधी शिरिष चिटणीस यांनी ही माहिती दिली.साहित्यिक आणि मराठी संशोधन मंडळाचे माजी संचालक प्रदीप कर्णिक, साहित्यिक व समीक्षक डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.गोपाळराव जोशी यांनी 1892 मध्ये विलायतेचा प्रवास केला होता. या प्रवासाचे वर्णन करणारी त्यांची लेखमाला ‘केसरी’त सोळा भागात क्रमशः प्रसिद्ध झाली.आनंदीबाई जोशी यांच्या मृत्युनंतर गोपाळराव जोशी यांनी विलायतेचा प्रवास केला. तेथे ते 14 महिने राहिले. पुण्याहून निघाल्यापासून परतेपर्यंतचे त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले. यात त्यांच्या सूक्ष्म निरिक्षणशक्तीचा आणि लेखनशैलीचा प्रत्यय येतो. दुर्दैवाने हे प्रवासवर्णन अलक्षित राहिले. ते डॉ. अनंत देशमुख यांनी शोधून काढले आणि संपादित केले. 19 व्या आणि 20 व्या शतकातील महाराष्ट्र, हा डॉ. अनंत देशमुख यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे. पुणेकर नागरिकांनी या प्रकाशन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपसिथत राहावे, असे आवाहन चिटणीस यांनी केले आहे.