विजय ढालपे,गोंदवले : माण विधानसभा मतदारसंघात एकूण एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी भाजपचे जयकुमार गोरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांच्यात काट्याची टक्कर आहे.
त्याचाच प्रत्यय आज मतदानासाठी लागलेल्या चढाओढीतून पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचा परिणाम म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानात मोठी वाढ झाली.
मतदारसंघातील माण व खटाव तालुक्यांत तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या आज ७१.४१ टक्के मतदान झाले. प्रामुख्याने आंधळी, बिदाल, मायणी, निमसोड हे गट तर दहिवडी, म्हसवड, वडूज, मायणी, निमसोड, बिदाल, औंध ही गावे या ठिकाणचे मतदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
थंडीमुळे सकाळी ७ ते ९ या दोन तासांत फक्त ३.८ टक्के इतकंच मतदान झाले होते. त्यानंतर थंडी कमी होऊन ऊन वाढल्याने मतदानानेही वेग पकडला व त्यानंतरच्या ९ ते ११ या दोन तासांत मतदानाची टक्केवारी १५.२१ वर पोचली. ११ ते १ दरम्यानच्या दोन तासांत या टक्केवारीत दुप्पटीने वाढ होऊन ती २९.६९ इतकी झाली, तर १ ते ३ दरम्यान सुद्धा मतदानाची टक्केवारी चांगली होती. ३ वाजता टक्केवारी ४५.१० होती. त्यानंतर ३ ते ५ या दरम्यान सुद्धा चांगले मतदान होऊन टक्केवारी ६०.६९ वर पोचली.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३,६०,६६२ मतदारांपैकी २,१८,८८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात १,०९,८५१ पुरुष, तर १,०९,०३३ महिलांनी मतदान केले होते. पुरुषांपेक्षा महिलांची मतदानाची टक्केवारी जास्त होती. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली, तरी बहुतांशी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच होते. अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले.
मतदानाचा कल पाहता माण तालुक्याने जयकुमार गोरेंना, तर खटाव तालुक्याने प्रभाकर घार्गेंना साथ दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही साथ किती प्रमाणात मिळाली यावरच जय – पराजय अवलंबून आहे. रासप, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष यांचे उमेदवार, तसेच ट्रम्पेट, ग्रामोफोन ही चिन्ह हे सगळे कोणाचे गणित चुकवणार अन् कोणाला फायदेशीर ठरणार यावर सुद्धा हा अटीतटीचा निकाल अवलंबून आहे.