सातारा ; भारतीय जनता पक्षाचे आक्रमक आमदार व सातारा जिल्हाध्यक्ष मान- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. याबाबत माहिती अशी की, आ जयकुमार गोरे व त्यांचे अंगरक्षक, स्वीय सहाय्यक, वाहनचालक असे चौघेजण पुणे येथून दहिवडी येथे पहाटे निघाले होते. फलटण शहरानजिक बाणगंगा नदीच्या पुलावर शंभर नंबरी वाहनाचा ताबा सुटल्याने वाहन थेट ५० फूट नदीपात्रात कोसळून अपघात झाला. यामध्ये आमदार गोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या सोबत असणारे इतर तीन व्यक्तीही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे येथील रुबी दवाखान्यात आ गोरे यांच्या वर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहेत. इतर जखमींना बारामती येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदरची घटना समजताच पोलीस यंत्रणा व मदत कार्य वेगाने सुरू झाले. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आ गोरे हे नागपूर येथून पुसेगाव व त्यानंतर पुणे येथे गेले होते. मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते दहिवडी ता माण च्या दिशेने जाताना हा अपघात झाला. आ गोरे व इतरांची चौकशी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व मतदार संपर्क साधून माहिती घेत आहेत. आ गोरे यांच्या हात,छाती व डोक्याला मार लागला असला तरी कोणताही धोका नाही, त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारावी. त्यांनी पुन्हा नव्याने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दयावे यासाठी सर्वजण प्रार्थना करीत आहेत. अनेक मान्यवरांनी दूरध्वनी व मोबाईलवर आ. गोरे व इतर जखमींची संपर्क साधून त्यांची चौकशी करीत आहेत.
अपघात घडला त्यावेळी जयकुमार गोरे यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक पोलीस शिपाई , स्वीयसहायक आणि काही कार्यकर्ते होते. या तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. जयकुमार गोरे यांच्यासह गाडीत असलेल्या सर्वांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.