फलटण
मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून जावी अशी आपली मागणी पंतप्रधानांनी मान्य केली असून लवकरच त्याला तांत्रिक मंजुरी मिळेल असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर, अक्कलकोट, आदि मंदिरांमध्ये अभिषेक घालणार असून त्याचा प्रसाद घेऊन पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
711 किलोमीटरच्या मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित प्रकल्पांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, माळशिरस, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विक्रमाबाद, या मार्गे हैदराबाद असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. दर ताशी सुमारे 350 किलोमीटर किलोमीटर वेगाने ही रेल्वे धावणार आहे.. एका ट्रेनची आसन क्षमता 750 असून मुंबई हैदराबाद अंतर केवळ तीन तासात पूर्ण होणार आहे. सध्या मुंबई हैदराबाद या प्रवासासाठी 14 तास लागतात. त्यामुळे पैसा, दगदग, आणि वेळ वाचणार असल्याची भूमिका खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केली आहे. रेल्वे मंडळाला याबाबतचा डीपीआर सादर करण्यात आला असून लवकरच याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत तांत्रिक मान्यता मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.