मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील बेरोजगार स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळणार का?

0

 राहील वारूणकर( महाबळेश्वर )-  पर्यटन क्षेत्राचा विकास करताना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ऐवजी स्थानिक भूमिपुत्रांचे अनेक वर्षापासून  सुरू असलेले उद्योग उध्वस्त करण्याचे काम पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या नावाखाली सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यात भूमिपुत्र  बेरोजगार होत असताना मुख्यमंत्र्यांनी भूमिपुत्रांच्या अडीअडचणी जाणून घेऊन भूमिपुत्रावर होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्रांकडून मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे .

          महाबळेश्वर पर्यटन विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी आला असून पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र होत आहेत. वेण्णा लेक  येथील स्टॉल धारक व कणीस विक्रेते यांच्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करत  यांची दुकाने बंद करण्यात आली. आता महाबळेश्वर येथील हातगाडी व स्टॉल धारकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

   वेण्णा लेक येथे सुमारे दीडशे कुटुंब आपला  उदरनिर्वाह  करण्यासाठी छोटा मोठा व्यवसाय करत होते परंतु पर्यटन विकास यांच्या रोजगारावर उठला  .पर्यटन क्षेत्राचा विकास करत असताना भूमिपुत्रांना मात्र उपाशी मराव लागत आहे. वेण्णा लेक येथील भूमिपुत्रांना बेरोजगार करून पर्यटन क्षेत्राचा विकास करून काय साध्य होणार आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास करत असताना स्थानिक युवकांना  रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे ऐवजी त्यांच्या रोजगारा वर बुलडोजर चालवले जात आहेत.

   महाबळेश्वरातील 90 टक्के लोकसंख्या ही पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. येथे येणारे पर्यटकांना चमचमीत खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय करून अनेक कुटुंब पिढीने पिढ्या आपला उदरनिर्वाह करत आहेत. मकई कणीस, फ्रँकी पॅटीस, कांदा भजी,  मॅगी, आईस गोळा, चहा कॉफी अशा छोट्या स्वरूपातील  व्यवसायाने येणाऱ्या पर्यटकांना सेवा देण्याचे काम येथील  स्थानिक करत असतात. महाबळेश्वरातील डोंगराळ भागात औद्योगिक कंपन्या कारखाने नसल्यामुळे येथील स्थानिकांना पर्यटन क्षेत्रावरच आपला उदरनिर्वाह करावा लागतो.

  कोविड काळातील दोन वर्षात पर्यटन क्षेत्राचा कणा मोडला होता. पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या महाबळेश्वर वासियांची आर्थिक  परिस्थिती बिकट झाली होती. कोविड काळात कुटुंबाच्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अनेकांना कर्ज घ्यावी लागली लॉकडाऊन नंतर पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतली, कुठे आता आर्थिक स्थिरता येत असतानाच शासनाने विकासाच्या नावा खाली महाबळेश्वर स्थानिक भूमिपुत्रांचे  रोजगार उध्वस्त केले. एकीकडे पर्यटन क्षेत्राचा विकास होत असताना भूमिपुत्र मात्र बेरोजगार होत आहेत या भूमिपुत्रांच पुनर्वसन करणे गरजेचे आहे अथवा यांना रोजगार उपलब्ध करणे शासनाची जबाबदारी  आहे.

       स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व पक्षांच्या वचननाम्यात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची फक्त आश्वासनच दिली गेली. गोरगरीब स्थानिक युवकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याची शोकांतिका असून धन दांडग्यांची अनधिकृत बांधकामावर ची कारवाई थांबवण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी लुडबुड करत होते.

एकीकडे धन धांडग्यांनी केलेली अनधिकृत बांधकामे  दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून शासनाकडून त्यांच्यावर कुठली कारवाई न करता किंवा दिखाव्यापूर्ती कारवाई करून  त्यांना अभय देण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे गोरगरीब स्थानिकांचे छोटे छोटे व्यवसाय अतिक्रमणाच्या नावाखाली उध्वस्त केले जात असून धन दांडगे तुपाशी गरीब जनता उपाशी अशी परिस्थिती तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here