अनिल वीर सातारा : महान गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि संगीतकार नौशाद यांच्या जयंतीनिमित्त या दोन महान कलाकारांना संगीतातून आदरांजली वाहण्यात आली. येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आणि कला सरगम सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ” प्यार किया तो डरना क्या ? ” या कार्यक्रमात मोहम्मद रफी आणि नौशाद यांच्या आठवणींना उजाळा देताना गायक कलाकारांनी त्यांची गाणी सादर केली.
दीपलक्ष्मी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी डी एन वैद्य,अनिल वाळिंबे, डॉ कामिनी पाटील,मुकुंद फडके,शिरीष चिटणीस,मुकुंद पांडे आणि कलाकारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.मुकुंद पांडे यांचे दिग्दर्शन आणि शिरीष चिटणीस यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात ॲड. लक्ष्मीकांत अघोर, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, ॲड.आशुतोष वाळिंबे, परितोष अघोर, प्रिया अघोर, मधु गिजरे,विजया चव्हाण, ॲड. रेश्मा वाळिंबे, आणि मुकुंद पांडे यांनी सदाबहार गीते सादर केली.
यावेळी बोलताना मुकुंद फडके म्हणाले,”रफी एक महान गायक होते. महान माणूसही होते. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची गाणी गायली जातात.” पडद्यावर कोण कलाकार आहे ? याचे भान ठेवून मोहम्मद रफी यांनी आपला आवाज वापरला. त्यामुळे त्यांच्या गायकीतील वैविध्य दिसून आले.नौशाद यांच्या मार्गदर्शनाखाली रफी यांनी अनेक उत्कृष्ट गाणी दिली जी आजही ऐकली जातात.असेही मुकुंद फडके यांनी स्पष्ट केले. मोहम्मद रफी यांनी जोपासलेल्या माणुसकीची सहकार्याच्या भावनेची काही उदाहरणे यावेळी त्यांनी सांगितली.शिरिष चिटणीस यांच्या पुढाकारामुळे असे कार्यक्रम शक्य होतात असे त्यांनी स्पष्ट केले. डी एन वैद्य यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले.निवेदन स्नेहल कुलकर्णी यांनी केले.सांगीतिक मेजवानीला सातारकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.