म्हसवड शहरात पाण्याचा प्रश्न बनला अतिशय गंभीर

0

म्हसवड : शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असुन १५ दिवसांतून एकवेळ पालिकेकडुन शहराला पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.
यावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येथील नाभिक गल्लीतील महिलांनी एकत्र येत थेट पालिकेत धडक मारत त्याठिकाणी ठिय्या मांडल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली.
जोवर पाणी मिळणार नाही तोवर न उठण्याचा निर्धार व्यक्त केल्याने अखेर मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी आज ५ वाजेपर्यंत पाणी देत असल्याचे लेखी आश्वासन संबधित महिलांना दिल्यावर महिलांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.


म्हसवड शहराला पालिकेकडुन होणार्या पाणी पुरवठ्यामध्ये सध्या कमालीचा विस्कळीतपणा आला असल्याने शहराला पिण्याचे पाणी १५ दिवसांतुन एकवेळ असा आता होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांकडुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्याला पालिका प्रशासनच जबाबदार असून नागरिकांची पाण्यासाठी भटकंतीही याच प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सुरु असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.
सध्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत असल्याने अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, शहर परिसरातील पाण्याचे स्तोत्रही आटू लागल्याने पाण्याच्या टँकरचेही दर दररोज वाढू लागले आहेत. त्यामुळे विकतचे पाणी घेणेही सामान्य नागरीकांना परवडत नाही तर पालिका प्रशासनही पाणी देत नाही. त्यामुळे सामान्य जनतेने करायचे तरी काय ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरु असुन मुख्याधिकारी हेच शहराचे आता सर्वेसर्व्हा आहेत त्यामुळे शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्याला तेच जबाबदार असून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याबरोबरच मुलभुत सुविधा देण्याची जबाबदारीही प्रशासनाचीच असल्याचा सूर यावेळी आंदोलनस्थळी आळवण्यात आला. तर पालिकेकडुन सध्या सोडण्यात येत असलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा व घाण येत असुन त्यावर तवंग निर्माण होत आहे तर त्या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वासही येत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
पाणी पुरवठा करताना भेदभाव
पालिकेचे पाणी पुरवठा कर्मचारी हे पाणी पुरवठा करताना भेदभाव करीत असल्याचाही आरोप यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी प्रशासनाकडे केला. पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी शहरात एकदा फिरुन शहराची अवस्था व पाण्याची दाहकता लक्षात घ्यावी,
सामान्य जनतेचे पाण्यासाठी होत असलेले हाल प्रशासनाने लक्षात घ्यावे त्यावर त्वरित उपाययोजना राबवुन शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करुन नागरीकांना दिलासा द्यावा अशी एक मुखी मागणी नागरिकांतून होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here