साताऱ्यातून पैलवान बंडा जाधव व सहकाऱ्यांचा अभिनव उपक्रम
सातारा, दि.12, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांसह विविध युगपुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी ठोस कारवाई करणारा कायदा व्हावा, या मागणीसाठी देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांना पत्रलेखन करण्याच्या अभिनव आंदोलनास साताऱ्यातून प्रारंभ झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते विवेक जाधव उर्फ बंडा पैलवान यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या अनोख्या आंदोलनास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच समाजास दिशा मिळा ली. या युगपुरुषांचे सर्वांवरच अगणित उपकार आहेत. अशा परिस्थितीत या थोर महात्म्यांबाबत काही अपप्रवृत्ती चुकीची विधाने करून सामाजिक अशांतता निर्माण करतात. अशा विध्वंसक व्यक्ती व समूहांवर ठोस कारवाई व्हावी, यासाठी स्वतंत्र कायदा व्हावा अशी मागणी विवेक जाधव उर्फ बंडा पैलवान यांनी केली असून त्या आशयाची पत्रे महाराष्ट्रासह राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना आणि देशाचे पंतप्रधान व सर्वच घटनात्मक प्रमुखांना पाठवली आहेत. या विशेष अभियानाचा प्रारंभ राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून साताऱ्यातून करण्यात आला. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी युवा कार्यकर्ते व मल्ल उपस्थित होते पवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बंधन करून व त्यांच्या चरणी या पत्रांचे पूजन करून त्यानंतर मुख्य टपाल कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांना व घटनात्मक प्रमुख मान्यवरांना टपालाद्वारे ही पत्रे पाठवण्यात आली. या अभिनव उपक्रमाबद्दल विविध मान्यवरांनी आणि स्वाभिमानी नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून विवेक जाधव उर्फ बंडा पैलवान यांनी घेतलेल्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले आहे. या संकल्पाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून अनेक युवकांनीही फोनवरून या उपक्रमात सहभागी होत असल्याबद्दल कळवून श्री. जाधव यांना या मोहिमेस पाठिंबा दिला आहे. *फोटो कॅप्शन* सातारा : पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्यमंत्र्यांना पत्र लेखनाच्या अभिनव अभियानाचा प्रारंभ करण्यात आला दुसऱ्या छायाचित्रात मुख्य टपाल कार्यालयातून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवताना विवेक जाधव उर्फ बंडा पैलवान व प्रमुख युवक कार्यकर्ते