अनिल वीर सातारा : युवकांनी छ.शिवराय यांच्या विचारांचा आदर्श प्रत्यक्ष कृतीतून दाखवला पाहिजे.असे आवाहन डॉ.शशिकांत साळुंखे यांनी केले. परखंदी ता. वाई येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीरातील पहिले पुष्प गुंफताना डॉ.साळुंखे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.बाळासाहेब कोकरे होते.यावेळी सरपंच सौ . चित्रा जाधव व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. हरेश कारंडे उपस्थित होते.
डॉ.शशिकांत साळुंखे म्हणाले, “युवकांनी सर्व प्रथम स्वतःचे शरीर निरोगी राहण्यासाठी रात्री लवकर झोपावे. सकाळी लवकर पहाटे उठून व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी. घरातील आई-वडीलांना कामात मदत करावी. मोठ्यांचा मान राखून उत्तम संस्कार अंगिकारावे. भारतीय संस्कृती जोपासावी. आहार परिस्थितीनुसार साधा व घरात उपलब्ध असेल ते आनंदाने खावे.वाचन संस्कृती जोपासावी.अंधश्रद्धा व व्यसनमुक्त व्हावे. तरच उद्याचा समाज आणि देश घडेल.आजचा युवक व उद्याचा भारतीय नागरिक म्हणून जबाबदारी आहे.”
प्रा.बाळासाहेब कोकरे म्हणाले , “श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण स्वतःला घडवूया.स्वत:चा सर्वांगिण विकास कसा होईल ? याकडे जाणीव पूर्वक लक्ष देवूया. साहजिकच तुम्ही एक एक जन घडला की, भविष्यात अनेक गावे विकसित होतील. यात कोणतीही शंका नाही.”
स्वयंसेवक विद्यार्थी झेद पटवेकर यांनी प्रास्ताविक केले. क्षितेश भिलारे याने परिचय करून दिला.सुत्रसंचालन प्रज्वल जाधव याने केले तर आभारप्रदर्शन महेंद्र मठपती यांनी केले. सदरच्या कार्यक्रमास परखंदी गावचे ग्रामस्थ,विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.