सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर रायगाव फाटा परिसरातील कुसुम पेट्रोल पंपाजवळ समोरील ट्रकला पाठीमागून एसटी बसने धडक दिल्याने बसमधील चालकासह चौघे जण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड डेपोची बस (एमएच 14 केक्यू ०४०१) ही मुंबई सेंट्रलवरून कराडला जात होती.
महामार्गावरील रायगाव फाटा परिसरात बस आली असताना बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसने समोरील ट्र्क (जीए ०५ टी ७४२३) ला पाठीमागील बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत बसचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
तर या अपघातात बसचा चालक तुषार तानाजी साठे ( वय 30, रा. मासोली ता. कराड), बसमधील प्रवासी सदाशिव रामचंद्र गोरड ( वय 76, रा. दिडवाघवाडी ता. माण), संतोष दाजी काळेल (वय 41), सौ वर्षा संतोष काळेल (वय 38 , दोघे रा. वळई ता. माण) हे जखमी झाले आहेत. जखमींना सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. नि. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. मोरे, पो. ह. वायदंडे करत आहेत.