राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे संस्कारशिल व सक्षम नागरिक बनविणारी कार्यशाळा :-प्राचार्य जगन्नाथ पाटील

0

           

कडेगांव दि.23 (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत अनेक थोर विभुतींचे योगदान आहे. आज ग्रामीण भागात तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचले असून महाविद्यालयिन स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे संस्कारशिल व सक्षम नागरिक बनविण्यारी कार्यशाळा आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संस्कारशील विद्यार्थी घडवून राष्ट्रभक्ती, सद् भावना व बंधुभाव निर्माण करुन  देशाच्या विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन सोलापूर येथील भारती विद्यापीठाचे प्राचार्य जगन्नाथ पाटील यांनी केले.

               ते कोतवडे ता. कडेगांव येथे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज कडेपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या  ‘विशेष संस्कार शिबिराच्या’ उद् घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूराव पवार हे होते. यावेळी माजी सरपंच प्रकाश उर्फ आप्पा यादव, सामाजिक कार्यकर्ते दिनकर यादव, सोसायटीचे चेअरमन अशोक यादव उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा. सौ. संगीता पाटील यांनी विशेष संस्कार शिबिराचा उद्देश आपल्या प्रास्ताविकामधून सांगितला.

            यावेळी अध्यक्षपदावरुन बोलताना प्राचार्य बापूराव पवार म्हणाले की, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे या हेतूने राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती केली आहे. विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील प्रथा, परंपरा, सांस्कृतिक  परिसराचा अभ्यास करुन जे जे चांगले आहे ते ते विद्यार्थीनी आत्मसात करावे या उद्देशाने निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते असे सांगून प्राचार्य डॉ.बापूराव पवार शेवटी म्हणाले की, विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमसंस्कार रुजवून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हा शिबिराचा गाभा असल्याचे शेवटी म्हणाले.

         या सात दिवस चालणाऱ्या विशेष श्रमसंस्कार शिबिरांमध्ये सकाळी प्राणायम, प्रभातफेरी, श्रमदान, गटचर्चा, विविध व्याख्याने, ग्रामसर्व्हे, सहविचार सभा असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. प्रारंभी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा.सौ. संगीता पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.राजेंद्र महानवर यांनी केली. सूत्रसंचालन प्रा.कुमार इंगळे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. सुरज डुरेपाटील यांनी केले. यावेळी प्रा. दत्तात्रय होनमाने, प्रा. डॉ. सुरज कचरे, प्रा. शीला इंगवले, प्रा. डॉ. अनिता व्हटकर, प्रा. डॉ. अरुणा कांबळे, व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here