महाबळेश्वर : लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या शेतीवर गव्याच्या कळपाने धुडगूस घालत आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान देखील होत आहे.
महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात रानगव्यांची संख्या झपाट्याने मोठ्या वाढू लागली आहे. या गव्यांच्या उपद्रवामुळे महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेती धोक्यात आली आहे. हातातोंडाला आलेली स्ट्रॉबेरी आता ऐन हंगामात आली आहे. अशातच गव्याचे कळप (Strawberry) स्ट्रॉबेरी शेतीला लक्ष्य करीत आहेत. सकाळी सातच्या सुमारास लिंगमळा येथे राहणारे सुदेश बावळेकर व इतर अनेक शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये २० ते २५ गव्यांचा कळप शिरला होता.
कळपातील गव्यांनी स्ट्रॉबेरीची रोपे खाऊन टाकली. स्ट्रॉबेरी पिकाला माती लागू नये व खराब होऊ नये, म्हणून हजारो रुपये खर्च करून त्यावर काळा प्लास्टिकचा पडदा टाकला होता. त्याचेही या रानगव्यांनी मोठे नुकसान केले आहे. लिंगमळा परिसरातील शेती या गव्यांनी तुडवल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वन वनविभागाने या स्ट्रॉबेरी पिकाची नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शरद बावळेकर यांनी वन विभागाकडे केली आहे.