वाईचे भीम अनुयायी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणार

0

आंबेडकरी मते चालतात संविधानाच्या शिल्पकांराचे नाव का चालत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

वाई; 07/10/2024 तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई वाईचे आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोनगीरवाडी या नगरपालिका प्रभागातील शाळा क्रमांक १ याचे उद्घाटन होणार आहे. मागील जवळपास एक वर्षांपासून सदर शाळेला भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी समस्त आंबेडकरी अनुयायी करत आहेत. त्या अनुषंगाने अनेक निवेदने व आंदोलने यापूर्वी करण्यात आली आहेत.

गतवर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये देण्यात आलेल्या निवेदनानंतर या शाळेला बाबासाहेबांचे नाव देण्यासंबंधी मार्गदर्शन मिळावे या मागणीचे पत्र नगरपालिका मुख्याधिकारी यांनी जिल्हा सह आयुक्त यांना लिहिले. यानंतर शाळेला नाव देण्यासंबंधी योग्य निर्णय शासन घेईल अशी अपेक्षा अनुयायांनी केली. मात्र मागील १० महिन्यांमध्ये या प्रकरणी शासनाकडून कोणतेही मार्गदर्शन पर पत्र वाई नगरपालिकेला आले नाही अशी माहिती आज मुख्याधिकारी यांनी दिली त्यामुळे या संबंधी शासन बिलकुल गंभीर नाही असे दिसते.

त्यामुळे उद्या होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात शाळेला नक्की कोणत्या महापुरुषांचे नाव देण्यात आले आहे याबद्दल मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता सध्या शाळेला कोणाचेही नाव देण्यात आले नाही अशी माहिती दिली. मग चिडलेल्या अनुयायांनी डॉक्टर आंबेडकरांच्या नावाची मागणी केल्यामुळेच तुम्ही जाणीवपूर्वक नावासंबंधी योग्य निर्णय घेत नाही अशी तुमची भूमिका दिसत आहे असा आरोप मुख्याधिकारी यांच्यावर केला त्यावर हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही असे उत्तर त्यांनी अनुयायांना दिले. यावर अनुयायांनी चिडून जर उद्या दुसऱ्या कुठल्या महापुरुषाचे नाव तुम्ही या शाळेला दिले तर आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भर रस्त्यात काळे झेंडे दाखवू अशी गर्जना केली.

आम्हाला अटक झाली तरी आम्ही काळे झेंडे दाखवण्याचा निषेध आंदोलन करणारच अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे नावासंबंधी नगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे आणि त्यावरच उद्याचे आंदोलन विसंबून आहे. वाईचे पोलीस उपाधीक्षक भालचिम यांना समस्त आंबेडकरी अनुयायांच्या वतीने उद्या करण्यात येणाऱ्या आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची मते चालतात पण त्यांचे नाव नाही ही भावना आज आंबेडकरी अनुयायांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here