वाठार स्टेशन परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीची बॅटिंग

0

वाठार स्टे.- सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे मंगळवारी दिवसभर भरपूर उष्णता होती.उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा दिलासा मिळाला मंगळवारी सायंकाळी आठ वाजल्याच्या सुमारास विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली.
लगातार पडलेल्या अवकाळी पावसाने बळीराजा सुखावला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली त्यामध्ये सातारा- लोणंद राज्य महामार्गावरील अनेक झाडांचा समावेश आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या वतीने दुरुस्तीची कामे चालू असून काही गावात वीस पुरवठा सुरळी झाला असला तरी अनेक गावात गेले दोन दिवसापासून वीजपुरवठा बंद आहे. वाठार स्टेशन, विखळे, जाधववाडी, बिचुकले, देऊर,पिंपोडे खुर्द, तडवळे, दहिगाव, परिसरात दि. २० रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे मंगळवारी सकाळ पासूनच वातावरणात उष्णता वाढली होती. नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. सायंकाळी आठ वाजता विजेच्या कडकडासह पावसाने जोरदार बॅटिंग केली.
या वादळी वाऱ्यात वाठार स्टेशन येथील विठ्ठल कांबळे यांच्या पिठाच्या चक्कीवर ६५ वर्षांपूर्वीच्या उंबराच्या झाडाची मोठी फांदी पडली. त्यामुळे त्यांच्या पिठाच्या चक्कीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तसेच पिंपोडे खुर्द येथे अवकाळी वादळी पावसाने माने यांच्या घरावरील सोलर संच तसेच शेतातील शेतकऱ्यांच्या कांद्याची ऐरणी भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाठार – वाई रस्त्यावर वाठार स्टेशन येथे दुतर्फा असलेली ब्रिटिशकालीन वडाच्या झाडाच्या फांद्या तसेच लिंबाचे झाड रस्त्यावर आडवे झाले त्यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद झाली होती.
परिसरातील विजेचे खांब, विद्युत वाहक तारा पडल्याने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.वादळी पावसाने नुकसान झालेल्या वाठार स्टेशन ता.कोरेगाव येथे जाऊन तलाठी सोनवणे, मोहसीन पठाण यांनी पंचनामे केले. वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या लोकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
झाडे पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत
वादळी वाऱ्यामुळे मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास वाठार-भाडळे रस्त्यावर अनेक झाडे पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मात्र पर्यायी मार्ग असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विखळे गावातून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली. विखळे गावातील प्रशांत कांतीलाल अहिरेकर यांच्या घरासमोरील शेडचे पत्रे उडून शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here