पुढील 24 तासांत धडकी भरवणारं हवामान
स्वामी सदानंद;सातारा : गुढीपाडव्या पासूनच राज्याच्या काही भागांमध्ये उकाडा वाढला, तर काही भागांमध्ये दमट हवामानात आणखी भर प़डली. मुंबईत सध्या अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवाच झाली असून, त्यामुळं पुढील 24 तासांसह चालू आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागांसह मुंबई महानगर प्रदेशात आणि उपनगरांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये अवकाळीची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.
फळबागा आणि शेतपिकांवर याचे परिणाम होणार असल्यामुळं हवामानाची ही स्थिती शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे.
राज्यात पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. य़ादरम्यान मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल होत असून, त्यामुळं वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. IMDच्या अंदाजानुसार आजपासून काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात दाटून आलेल्या ढगांमुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे, त्याच धर्तीवर मंगळवारी नाशिकसह जळगावला ‘ऑरेंज’ आणि धुळ्यात पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीचासुद्धा सामना करावा लागणार आहे. पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोकणातही हीच स्थिती…
फक्त मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडाच नव्हे, तर दक्षिण कोकणातही हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरीसह नजीकच्या परिसरात पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून, उत्तर कोकणासह ठाणे, कल्याण भागालासुद्धा पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या या स्थितीमुळं मुंबई शहरातील तापमानात घड झाली असली तरीही उष्मा मात्र कमी झालेला नाही. त्यामुळं अवकाळीनंतरच होरपळ नाकारता येत नाही.
उन्हाळ्याचं खरं रुप तर आता पाहायला मिळेल…
यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत देशभरात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. ज्यामुळं उष्णतेच्या झळांची तीव्रता वाढणार असून ती नेहमीपेक्षा अधिक दिवस जाणवण्याची शक्यता आहे.