फलटण प्रतिनिधी
विडणी ता. फलटण येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विडणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तेरा उमेदवार आणि खासदार गट पुरस्कृत चार उमेदवार विजयी झाले आहेत. थेट निवड पद्धतीने खासदार गट पुरस्कृत उमेदवार सरपंच पदी निवडून आलेला आहे.
विरोधी पक्षाकडून काही ऑफर दिली जात असल्याची कुणकुण लागल्याने आणि कोणी फ़ुटू नये म्हणून सावधगिरी घेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची तेराही उमेदवार इतरत्र पुणे जिल्ह्यात बाहेर गावी हलवले होते. तेथे 31 डिसेंबर रोजी सायंकाळी रामदास पवार या उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.एक जानेवारी रोजी त्यांचा विडणी येथे अंत्यविधी करण्यात आला आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तसेच लहानपणापासून ते एका हाताने दिव्यांग होते. परंतु त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केल्याची भावना विडणीकर व्यक्त करताना आढळतात. एका हाताने दिव्यांग असून सुद्धा शेतीतील कामे तसेच ट्रॅक्टर चालवणे हे करत होते. त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल विडणीकरांनी हळहळ व्यक्त केली आहे.