अनिल वीर सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – 2024 या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांना महाराष्ट्र कोअर कमिटी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकासंदर्भात सविस्तर चर्चा केली. लोकसभेच्या वेळेस भारतीय संविधान रक्षक म्हणून महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळेच दलित समाजाची हक्काची मते महाविकास आघाडीच्या पदरात पडली.त्यामुळेच महाविकास आघाडीला घवघवीत यश आले होते. आता सुद्धा धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर राहुन संविधानासाठी वाटेल ते करु.
जातीवाद्यांना सत्तेच्या बाहेर ठेवण्याकरता रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडीबरोबर येण्यास तयार आहे.परंतु जर तळागाळातील कार्यकर्त्यांसह पक्षाला सन्मानाची वागणूक न मिळाल्यास वेगळा विचार केला जाईल.येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष 200 च्या आसपास जागा लढवण्याची तयारी करण्याचेही आदेश अध्यक्ष यांनी दिले आहेत.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, राज्य संघटक कैलास जोगदंड, राज्य सचिव अशोक ससाणे, राज्य सचिव रमेश भोईर, राज्य कार्य कार्यकारी सदस्य तथा पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात, मुंबई प्रदेश कमिटीचे प्रसाद केळशीकर, मुंबई उपाध्यक्ष नितीन जाधव बच्छाव,अशोक बच्छाव,प्रशांत तोरणे,संजय कांबळे, प्रशांत दवटे, गिरीश डोळस आदी पदाधिकारी उपस्थित होते.