विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई

0

पाचगणी : पांचगणी पालिका हद्दीत विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूल विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी व ट्रॅक्टर ही वाहने जप्त केली.
किरण धनंजय सालने व प्राजक्ता । प्रसाद हसबनीस पांचगणी (ता महाबळेश्वर)यांच्या मिळकतीतील विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूल विभागाने धडक कारवाई केली.

या कारवाईमध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसिबी व ट्रॅक्टर ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या मिळकतीमध्ये पंचनामा करताना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अनमोल कांबळे रा पांचगणी व त्याचे सहकारी यांच्यावर पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी पत्रकारांना दिली.
त्यानंतर कांबळे यांनी समाज माध्यमावर प्रशासनाची बदनामी केली व त्याच जागी सूर्यास्तानंतर पुन्हा उत्खनन चालू केले. यानंतर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी थेट जागेवर जाऊन धडक कारवाई करत उत्खनन करताना पोकलेन मशीन व ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली. सध्या ही वाहने पांचगणी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये तहसिलदार तेजस्विनी पाटील यांना क्षेत्रीय महसूल अधिकारी रुपेश शिंदे,मंडलाधिकारी पाचगणी सागर शिंदे,ग्राम महसूल अधिकारी,पाचगणी व कर्मचारी यांच्यासह पाचगणीचे सहा पोलीस निरीक्षक यांनी सहकार्य केले.
मौजे भोसे ( ता महाबळेश्वर)येथे नुकतीच विनापरवाना माती उत्खनन व वाहनावरील दंड असे एकूण रु ८ लाख ४१ हजार ८००ची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.

महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील तालुका आहे. कोणत्याही जागेमध्ये विकसनाचे काम करीत असताना तहसील कार्यालयाकडे परवानगीबाबत रीतसर अर्ज करावा. विनापरवाना व बेकायदेशीरपणे कोणीही उत्खनन अथवा गौणखनिजाची वाहतूक करू नये. गौणखनिज उत्खननाबाबत या कार्यालयाकडून कोणत्याही रकमेची मागणी केली जात नाही, कोणी व्यक्ती अथवा त्रयस्थ व्यक्ती मागणी करीत असेल तर या कार्यालयाचे तात्काळ निदर्शनास आणावे.- तेजस्विनी पाटील,तहसीलदार. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here