शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

सातारा : शहीद वीर जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर आज सातारा तालुक्यातील कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव कामेरी गावी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी अर्चना, मुलगी साईशा, आई मनिषा, वडील समाधान व भाऊ संजय यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर भाऊ संजय यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here