गोंदवले – माहे डिसेंबर २०२४ ची शिक्षण परिषद जि.प.प्राथ.शाळा रानमळा ता.माण येथे संपन्न झाली सदर शिक्षण परिषद माणचे गटशिक्षणाधिकारी एल.एम.पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे, केंद्र प्रमुख दिपक पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व वडजल केंद्रांचे केंद्र संचालक सुनील महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली रानमळा शाळेत संपन्न झाली. यावेळी महामुनी बोलताना म्हणाले सदर शाळा शाळेच्या नावाप्रमाणेच शाळा रानात असुन परिसरात मळा देखील आहे तसेच शाळेतील विद्यार्थी देखील शिस्तप्रिय आहेत.
सदर शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला मा.पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर रंगोत्सव व समृध्दी उपक्रम या विषयी गटेवाडी शाळेचे उपशिक्षक बाळासो खाडे सर यांनी विस्तृत माहिती दिली. अध्ययन निष्पत्तीनुसार मासिक नियोजन याबाबत ढाकणी शाळेच्या उपशिक्षिका सौ.सविता नवत्रे यांनी मार्गदर्शन केले. करियर मेळावा व यशोगाथा या विषयी पानवण शाळेचे उपशिक्षक आप्पासो नरळे यांनी माहिती सांगितली. भाषा उत्सव व निपुण भारत याविषयी धुळेश्वरनगर शाळेच्या उपशिक्षिका सौ.भाग्यश्री नलवडे यांनी मार्गदर्शन केले.
हकेथाॅन या तंत्रज्ञाना विषयी वडजल माध्यमिक शाळेचे उपशिक्षक कॅप्टन वाघमारे सर यांनी विस्तृत माहिती दिली. शालेय व्यवस्थापन समिती विषयी चव्हाणवाडी शाळेचे उपशिक्षक हणमंत शिंदे यांनी माहिती दिली. सदर शिक्षण परिषदेस अरविंद शिंदे उपाध्यक्ष शाळा समिती रानमळा , शिक्षणप्रेमी नानासो नरळे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सुंदरराव पैठणे यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्या घोळवे यांनी मानले.