शिक्षक हे संस्कार पीठ : इंद्रजीत भालेराव.

0

सातारा : शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके शिकवणे हे शिक्षकांचे काम असतेच. मात्र, विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार रुजवण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षक हे संस्कार पीठ आहे.असे गौरवोद्गार मराठीचे जेष्ठ साहित्यिक व कवी इंद्रजीत भालेराव यांनी काढले.

                      येथील औद्योगिक वसाहतीमधील लोकमंगल हायस्कूल व लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमंगल हायस्कूल, गेंडामाळ येथील शिक्षिका सौ.शिल्पा  चिटणीस यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून इंद्रजीत भालेराव बोलत होते. यावेळी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि.ना.लांडगे,ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप चरेगावकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदा निकम, ज्योती नलवडे,  मुख्याध्यापिका विद्या बाबर, हेमंत भुजबळ व कल्याण भोसले प्रमुख उपस्थिती होती.

           इंद्रजीत भालेराव म्हणाले, “सहजपणे दंडवत घडो.असा हा आगळा वेगळा समारोह आहे. माझ्यावर प्रेम करणारे हे दांपत्य असून नवरा-बायको हे दोघे मिळूनही माझ्यावर प्रेम करतात. शासकीय नोकरीतून सेवक हे सेवानिवृत्त होत असतात. मात्र, आपल्या घरातील आई कधीही सेवानिवृत्त होत नसते. शेवटच्या क्षणापर्यंत ती आपल्या घरच्यांच्यासाठी काम करत असते. अशाच शिल्पाताई आहेत. त्या कधीही रिटायर होणार नाहीत त्यांच्या हातून यापुढेही शिक्षण क्षेत्रातील काम घडत राहो.”

             यावेळी शिरीष चिटणीस म्हणाले,”मलाअशी पत्नी मिळणे भाग्याची आहे. तिचा साधेपणा चांगल्या गोष्टी मला नेहमीच शिकायला मिळतात. तिने विद्यालयात नम्रपणाने नोकरी केली. ती एक उत्तम लेखिका, कवयित्री, नाटककार आणि चांगल्या प्रकारची रांगोळी कलाकार असल्याने मला तिचा सार्थ अभिमान आहे. नोकरी करत असताना माझ्या आई-वडिलांच्या आजारपणात तिची मला मोलाची साथ मिळाली. शिवाय,मुलावरही संस्कार उत्तम प्रकारचे केल्यामुळेच आज ते चांगल्या पद्धतीची नोकरी करीत आहेत.”

         दिलीप चरेगावकर म्हणाले, “चिटणीस मॅडम सेवानिवृत्त होत नसून त्या सेवाप्रवृत्त होत आहेत. रांगड्या मुलांवर संस्कार करण्याचे काम त्यांनी केले आहे. एक उत्तम प्रकारची गुणी अभिनेत्री म्हणूनही नाट्य क्षेत्रात नाव कमावले आहे. यापुढेही त्यांनी आपल्या कला जोपासल्या पाहिजेत.” यावेळी वि.ना. लांडगे, प्रतिभा वाघमोडे, काकासो निकम यांनीही आपली मनोगत व्यक्त केले.

   सत्काराला उत्तर देताना शिल्पा चिटणीस म्हणाल्या,”मी सदैव सर्व शिक्षकांचे ऋणी राहीन. शिक्षिका म्हणून २२ वर्षाची सेवा माझी चांगली झाली. अनेक विद्यार्थी मला घडवता आले.  शिक्षण क्षेत्रात काम करताना मला माझे पती शिरीष चिटणीस  यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. मी नेहमी शाळा हे सर्वस्व मानून काम केले.  यापुढे मी विद्यार्थ्यांची सेवा करीत राहीन. लोकमंगल ग्रुप हे आपले कुटुंब आहे हे कुटुंब मानून मला सर्वांनी सहकार्य केले. कलेचा वारसा मला माझ्या घरच्यांच्याकडून मिळाला. यामुळेच मला कला शिक्षिका होता आले.”

  शिल्पा चिटणीस यांचा मानपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.सदरच्या कार्यक्रमास अनिल वीर, विजय यादव, उदय जाधव, प्रदीप लोहार, संगीता कुंभार, लक्ष्मण जाधव, शशिकांत जाधव, दत्तात्रय सावंत, यशवंत शिलवंत, अभिजीत वाईकर, ऍड.विलास वहागावकर,ज्ञानेश्वर मोहोटकर, संदीप जाधव, वैशाली वाडीले व लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेतील सर्व विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. गुलाब पठाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा वाघमोडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here