सातारा /अनिल वीर : किल्ले प्रतापगडावर अनेक शिवप्रेमींनी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अफजलखान वध ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा थरार होता. आदिलशाही दरबारातून पैजेचा विडा उचलून चढे घोडीयानिशी शिवाजीला जिवंत किंवा मृत आपल्यासमोर आणून हजर करतो.अशी प्रतिज्ञा करून अफजलखान विजापुरहून निघाला होता.शिवरायांच्या बंदोबस्तासाठी 12 हजार घोडदळ व 10 हजाराचे पायदळ उंट,घोडे, हत्ती,तोफा,तलवारी- समशेरी,भाले,ढाली, कापड-चोपड,सामान-सुमान आणि 7 लक्ष रुपयाचा खजिना तसेच तीन वर्ष पुरेल इतकी मोहीम सामग्री घेऊन तो आला होता.अफजलखान स्वराज्यावर चालून आला होता.
अफजलखान म्हणजे अत्यंत क्रूर,निर्दयी व कसलेला सेनानी होता.रस्त्यात भेटेल त्याला चिरडत,गावच्या गावं जाळीत,शेतकऱ्यांची पिकं उध्वस्त करीत आलेला होता.खान वाईला पोचला.महाराजांनी अत्यंत अचूक नियोजन करून?अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याला येईल यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. 8 नोव्हेंबर 1659 रोजी खान प्रतापगडाच्या पायथ्याला कोयनेच्या काठावर असणाऱ्या पारसोंड या गावात पोहचला.तिथे छावणी केली. ठरल्याप्रमाणे 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या एका माचीवर म्हणजेच जणीच्या टेंभावर छ. शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट झाली. सर्वार्थानं बलाढ्य अशा खानाचा शिवरायांनी कोथळा काढला. तसेच खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याचाही वध केला.अफजलखानाच्या वकीलासह 10 च्या 10 अंगरक्षक मारले गेले.स्वराज्याच्या व रयतेच्या मुळावर उठलेला अफजलखान असो नाहीतर कृष्णा भास्कर कुलकर्णी तो स्वराज्याचा शत्रूच.तो कोणत्याही जाती-धर्माचा असो.उभा फाडला जाईल,
हा खूप मोठा संदेश शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी दिला.प्रतापगडच्या रणसंग्रामाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांचे चुलते मंबाजी भोसले,पिलाजी व शंकराजी मोहिते व बाजी घोरपडे हे मातब्बर मराठा सरदार अफजलखानाच्या बाजूने लढले होते.छत्रपती शिवरायांच्या 10 अंगरक्षकांपैकी सिद्धी इब्राहिम हा मुस्लिम अंगरक्षक महाराजांच्या बाजूने लढला. मंबाजी भोसले यात मारला गेला. झुंझारराव घाटगे,रणदुल्लाखान,अंबरखान व अफजलखानाचे 2 मुलं कैद झाली. मुसेखान,अंकुशखान हसनखान, याकूतखान व अफजलखानाचा मुलगा फाजलखान लढाईतून पळून गेले. या मोहिमेतून छत्रपती शिवाजी महाराजांना खानाच्या उध्वस्त छावणीतून 4000 हजार घोडी, 1200 उंट,65 हत्ती,3 लक्षाचे जडजवाहीर,7 लक्ष सोन्याच्या मोहरा व नाणी इ. 2 हजार कापडाची ठाणे,अनेक तोफा इ. ऐवज हाती आला.आदिलशाहीचं मोठं नुकसान झालं.रयतेच्या मनात आपल्या राजाबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला. अफजलखानाच्या वधाने स्वराज्यावरील संकटतर टळलेच पण छत्रपती शिवरायांची कीर्ती भारतभर पसरली.आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर योग्य नियोजनाने प्रयत्नपूर्वक मात करता येते. हाच संदेश शिवचरित्रातून आपल्याला मिळतो.आपल्यापेक्षा कित्येक पटीने शक्तिशाली अफजलखानाचा महाराजांनी कोथळा काढला.त्याच दिवसाबद्धल विक्रम कदम यांनी माहिती दिली.