सातारा : जावळी तालुका पुन्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी केळघर येथे स्वाभिमान सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी आलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांचे जावळीकरांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वागत केले. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात जावळीत आमदार शिंदेंचे स्वागत झाले. जेसीबीतून पुष्पवृष्टी व क्रेनच्या साह्याने भला मोठा हार घालण्यात आला.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आपली ताकत आजमावली जाणार आहे. निवडणुकीत काय व्हायचा तो निर्णय होईल. पण आता खासदार शरद पवार यांच्या गटाकडून भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात ताकत आजमावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
यातूनच आज सातारा-जावळी मतदारसंघात केळघर येथे आमदार शशिकांत शिंदे यांची स्वाभिमान सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने जावळीत विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले.
सभेसाठी आलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी दोन जेसीबींच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच भला मोठा हार क्रेनच्या साह्याने आमदार शिंदे यांना घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.