गोंदवले : माण तालुक्यातील समस्त श्रीरामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
२५ डिसेंबरच्या दिवशी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी समाधीवर गुलाल आणि पुष्प अर्पण करून महोत्सवाची सांगता झाली. पहाटेच्या थंडीतही टाळांचा गजर आणि मुखाने श्रीरामाचा नामजप करत भाविक तल्लीन झाले होते.
कोटी पूजन करून १६ डिसेंबर या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला होता. १० दिवसांपासून भक्तीमय आणि भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. समाधीवर अखंड श्रीरामनाम जप चालू होता, तसेच अन्नदान आणि महाप्रसादाचे भोजन कक्षामध्ये आयोजन चालू होते. मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आल्यामुळे परिसर उजळून निघाला होता. महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी लाखो भाविक सातारा, मुंबई, पुण्ो यांसह परराज्यांतून उपस्थित राहिले होते.