समाजवादी विचारांतून खटाव तालुक्यात परिवर्तन घडवणार…

0

कलेढोण : समाजभूषण हणमंतराव साळुंखे तात्यांचा समाजवादाचा आदर्श घेऊन खटाव तालुक्यात परिवर्तन घडवणार, असे उद्गार खटाव तालुक्याचे माजी आमदार व खटाव-माण साखर कारखाना पडळचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी केले.कलेढोण, ता. खटाव येथे आयोजित केलेल्या हणमंतराव साळुंखे सभागृहाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी हरणाई सूत गिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख,सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, रयत साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

घार्गे म्हणाले, तात्यांनी शैक्षणिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी हायस्कूल, सोसायटी, पतसंस्था उभी केली. कलेढोण मध्ये द्राक्षबागा उभ्या केल्या. शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी मदत केली. तात्यानी मला आमदारकी नको असे म्हटले होते.

त्यांचा त्याग फार मोठा आहे. माजी आमदार केशवराव पाटील यांना त्यांनी मोलाची साथ दिली. आपण नवी टीम निर्माण करुन समाज व्यवस्था बदलण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू, असे सांगून येणाऱ्या विधानसभेला आमदार आपल्यातलाच होईल असे सांगितले.

रणजितसिंह देशमुख म्हणाले ,तात्यांची प्रतिमा पाहिली व मन भरुन आले. पतसंस्था चांगल्या प्रकारे उभी आहे.तात्यांनी काँग्रेसचा विचार दिला आहे. तात्यांचा वारसा आपण स चालवला पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात काम करण्याची तात्यांना सवय होती.

अनिलभाऊ देसाई म्हणाले, तात्यांच्या नावाच्या सभाग्रहामुळे वैभवात भर पडली आहे. विलासकाका पाटील यांनी माणसे जपली. नाही म्हटले तर या कार्यक्रमाला राजकीय झालर आहे. ही विचारांची लढाई आहे. आम्ही एका विचाराने काम करु.

उदयसिंह पाटील म्हणाले, विचारांच्या अधिष्ठाणावरती राजकारणाची उभारणी केली. विचारांचा पाईक म्हणून समाज मान्यता मिळते. तत्वानुसार काम असल्यास समाज मान्यता देतो. व्यक्ती केंद्रित राजकारण नको.

काही घटकांकडून अस्मिता धोक्यात आणण्याचे प्रयत्न होत आहेत. सद्या बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे..सावकारीतून सोडविण्यासाठी पतसंस्था उभ्या राहिल्या..या संधीचे सोने केले पाहिजे, असे ते म्हणाले.

संजीव साळुंखे म्हणाले, तात्यांना मोहन धारिया,जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, भाई वैद्य, सरहद्द गांधी,जय प्रकाश नारायण या मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांनी १९७२ते१९८२ मध्ये रोजगार हमीची कामे केली. १७ पाझर तलाव झाले.

विलास काका पाटील, केशवराव पाटील यांचा पाठिंबा होता. यापुढेही विचारांचे राजकारण व्हावे. यासाठीच सर्वांना निमंत्रित केले आहे. यातीलच एक आमदार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मजनुभाई मुलाणी, डॉ. महेश गुरव,रघुनाथराव घाडगे, हणमंतराव साळुंखे पतसंस्थेचे व्हा. चेअरमन मजनुभाई मुलाणी, संचालक,सदस्य व कर्मचारीउपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here