कराड : कोकण किनारपट्टीसह राधानगरीच्या पट्ट्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर ४३ ठिकाणी संरक्षण कुटी आहेत. व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पाचही वन परिक्षेत्रात उभारलेल्या संरक्षणासाठी चार कोटींचा निधी मिळाला.
त्यातून अद्ययावत संरक्षण कुटी झाल्या आहेत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात श्वापदांच्या शिकारीही चोर वाटेने येणाऱ्या वृक्षतोडीवर कोकण किनार पट्टीतून येणाऱ्या पायवाटांसह चोरट्या वाटांवर वन्यजीवची करडी नजर आहे. वन्य जीव विभागाचा कर्मचारी त्या कुटीत २४ तास राहणार आहे. त्यांच्याकडे जीपीआरएस व अन्य अत्याधुनिक सुविधाही आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोयना व चांदोलीचे राष्ट्रीय अभयारण्य आहेत. व्याघ्र प्रकल्प चार जिल्ह्यांचा सीमावर्ती भागात आहे. सगळ्यात जास्त भाग सातारा जिल्ह्याचा आहे. प्रकल्पाची भौगोलिक स्थिती अडचणीची आहे. संरक्षण कुटींच्या जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोकणातील व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्यालगतच्या गावातील पायवाटा, जंगलातून वर येणाऱ्या छुप्या वाटा जटील, अवघड आहेत. त्या सापडतानाही कसरत करावी लागते. त्यामुळे त्या वाटा मोकळ्या होत्या. त्या भागात संरक्षण कुटी उभारण्यात आल्या आहेत.
वन्य जीव विभागाकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक, कोयना, बामणोली परिक्षेत्रात कायमच्या ४३ कुटी उभा आहेत. प्रत्येक कुटीत एक वनरक्षक व दोन वनमजूर संरक्षण देतील. त्याशिवाय त्यांच्याकडे अद्ययावत जीपीआरएस व शस्त्रेही आहेत. संरक्षण कुटी आड मार्गावरून व्याघ्र प्रकल्पात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे श्वापदाच्या शिकारी करण्यासाठी येणाऱ्यांना रोखता येणार आहेच, त्याशिवाय अवैध वृक्षतोडही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्याद्वारे होणार आहे. त्यामुळे येथे उभा केलेल्या संरक्षण कुटी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
असे होते संरक्षण
– सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कोयनेत ३८, चांदोलीत ३७ अशी ७५ नियतक्षेत्र (निरीक्षण) आहेत.
– शिकाऱ्यांसह अन्य लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोयनेत १९, तर चांदोलीत २४ अशा ४३ संरक्षण कुटी आहेत.
– प्रकल्पात संदेशवहनासाठी ४० बेस्टस्टेशन आहेत. त्यातील चार रिपिटर स्टेशन आहेत.
– जलाशय गस्तीसाठी स्पीड बोट व गस्ती बोट आहेत.
– पायी गस्तीसाठी एक हजार किलोमीटरच्या गस्ती पायवाटा तयार केल्या आहेत.
– दोन विभागातील आठ परिवनक्षेत्र, २३ वनपरिमंडळ व ७५ नियतक्षेत्रात विभागणी करून संरक्षण केले जाते.
– कोअर झोनमध्ये ७५ निरीक्षण क्षेत्रापैकी ४६ कोअर क्षेत्रात आहेत.
– प्रकल्पामध्ये १३ तपासणी नाके आहेत. त्यात कोयनेत चार, चांदोलीत नऊ आहेत.
परिक्षेत्रनिहाय संरक्षण कुटी वनपरिक्षेत्र संरक्षण कुटी संख्या
चांदोली ११
ढेबेवाडी पाच
हेळवाक १४
कोयना ११
बामणोली दोन