सातारा : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान होत असून महिनाभरात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे पाच तालुक्यांतील २५५.१२ हेक्टरवरील १३८० शेतकऱ्यांचे, तर बागायती पिकांचे कराड, पाटण आणि महाबळेश्वर तीन तालुक्यांतील ११.३० हेक्टरवर असे एकूण २६६.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील १,४४७ शेतकरी बाधित झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहेत. नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविले जाणार आहेत.
जिल्ह्यात सध्या सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा काही तालुक्यातील खरीप पिकांना फटका बसला आहे. यामध्ये भात, सोयाबीन, नाचणी, बाजरी, खरीप ज्वारी, भुईमूग पिकांचा समावेश आहे. सध्या शासनस्तरावरून पिकांच्या पंचनामे सुरू आहेत. खरीप पिकांचे २५५.१२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून बागायती पिकांचे ११.३० हेक्टरवर नुकसान झाले आहे.
खरीप पिकांमध्ये ५६.९३ हेक्टरवरील भात, १.४१ हेक्टरवरील सोयाबीन, २.२५ हेक्टरवरील नाचणी, १९४.१० हेक्टरवरील बाजरी, खरीप ज्वारी ०.३०, भुईमूग ०.१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. बागायती पिकांच्या नुकसानीत केळी, कांदा, बटाटा, हरभरा, भुईमूग, घेवडा, ऊस या पिकांचे क्षेत्र असलेल्या ६५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये कराड तालुक्यातील १.०९ हेक्टर, १०.०३ हेक्टर, पाटण तालुक्यातील ०.१९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान महाबळेश्वर तालुक्यातील सर्वाधिक ५८, पाटण तालुक्यातील तीन, कराड चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर भरपाई मिळण्यासाठीचे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
खरीप पिकांच्या नुकसानीचे तालुकानिहाय बाधित शेतकरी व कंसात क्षेत्र हेक्टरमध्ये : कराड तीन (१.२०), पाटण २३० (२०.९४), खंडाळा ९६ (२२), महाबळेश्वर ४७९ (३८.८८), फलटण ५७२ (१७२.१०) नुकसान झालेले आहे.