सातारा : पावसामुळे घटलेले उत्पादन, पडलेला दर, भिजलेला घेवडा खरेदीबाबत व्यापाऱ्यांची अनुत्सुकता आदी अनेक कारणांमुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उद्भवले आहे.
कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा घेवड्याचे आगार म्हणून ओळखले जाते. त्याच प्रमाणे संपूर्ण खटाव तालुका घेवड्याचे आगर आहे
या पिकाला साधारण कोरडे हवामान मानवते. अति पाऊस व जास्त तापमान त्यास सहन होत नाही. आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर, खेड आदी भागांत घेवड्याला जमीन आणि हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी त्याचे उत्पादन घेतात.
पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन भागात मे-जूनमध्ये त्याची लागवड होते. लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी उत्पादन सुरू होते. ओल्या शेंगांचे सुमारे पाच ते सहा तोडे होतात. एकूण एकरी ३५ ते ४० क्विंटल उत्पादन मिळते.
परिसरातील पिंपोडे बु्द्रुक, सोनके, नांदवळ, करंजखोप, वाघोली परिसरांत खरीप हंगामात घेवडा पिकाचे उच्चांकी उत्पादन घेतले जाते. घेवडा पिकातून मिळणाऱ्या आर्थिक मिळकतीवरच या परिसरातील शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते; परंतु या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे घेवड्याचे उत्पादन घटले आहेच.
याशिवाय काढणी काळात पावसाचा दीर्घकाळीन मुक्काम राहिल्याने घेवड्याचे अतोनात नुकसान झाले असून, पावसात भिजलेला घेवडा लाल पडला असल्या कारणाने व्यापाऱ्यांनी घेवडा खरेदीबाबत अनुत्सुकता दाखवली आहे.