सातारा : सातारा पालिकेच्या माध्यमातून करंजे पेठ येथे साकारण्यात येत घरकुल योजनेला मतकर झोपडपट्टीवासियांनी विरोध दर्शवला आहे. घरकुल योजनेसाठी सात लाख रुपये आम्ही भरणार नाही आणि आमची जागाही सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असून, याबाबतचे निवेदन प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना देण्यात आले आहे.
झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी सातारा पालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना आकाराला येत आहे. १ हजार ९५८ सदनिका असणारा हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा घरकुल प्रकल्प आहे. लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रति सात लाख रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. तशी कल्पना पालिकेकडून देण्यात आली होती. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच पालिकेने योजनेचे काम हाती घेतले. प्रारंभी ही अट मान्यही करण्यात आली. मात्र आता काही झोपडपट्टीवासीयांनी सात लाख रुपये भरण्यास असमर्थता दर्शविली आहे.
मंगळवारी दुपारी येथील बहुतांश नागरिकांनी पालिकेत धडक घेऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, झोपडपट्टीवासीय काबाडकष्ट करतात. त्यांना घरखर्च चालविण्यासाठी दररोज कसरत करावी लागते. सात लाख रुपये ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. बँकांमधून कर्ज घेतले तरी ते फेडताना अनेकांच्या नाकी नऊ येणार आहेत. कर्जावरील व्याजदरही अफाट आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीय आहे त्या जागेवर सुखी आहेत. कोणालाही सात लाख रुपये भरून घरकुल नको. पालिकेच्या कोणत्याही अटी आम्हाला मान्य नाहीत. कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांबाबत पालिका प्रशासन काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.