सातारा – मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध असलेले व सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चर्चेत बसलेले साताऱ्याचे अभिनेते किरण माने यांनी नुकतीच केलेली एक सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये किरण माने यांचा टॉप तीन स्पर्धकांमध्ये समावेश होता. साताऱ्याचा बच्चन म्हणून अशी ओळख असलेल्या मानेंनी साताऱ्याबद्दल एक पोस्ट शेअर केलीय. “खरंतर मुंबै लै आवडती पण सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या. सातारला येताना लिंबखिंडीतनं सातार्याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकत..,” अशी पोस्ट मानेंनी लिहली आहे.
अभिनेते किरण माने यांनी नुकतेच त्यांच्या Instagram अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी साताराबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.या पोस्टमध्ये मानेंनी म्हंटलं आहे की, “.लोकं म्हन्त्यात “सारखं शुटिंगसाठी मुंबई-सातारा-मुंबई.. कशाला यवढी दगदग करत असता? मुंबईत शिफ्ट व्हा की फॅमिली घेऊन.” खरंतर मुंबै लै आवडती. नाटका-सिनेमात रमनारी ! जगातलं हे एकमेव शहर असं आसंल, जिथं रोज, कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्यातरी नाटकाचा प्रयोग अस्तो. कुठं ना कुठं, कस्लं ना कस्लंतरी शुटिंग सुरू आस्तं. कस्लं भारीय हे !
पन सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या. गेली दहा वर्ष मी नाटक-सिनेमा सिरीयलनिमित्तानं हळूहळू मुंबैत बिझी होत गेलो. पन शुटिंग-नाटकाचं प्रयोग करून परत सातारला येताना लिंबखिंडीतनं सातार्याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकत. माझ्या घराशेजारी भक्कम पाय रोवून माझ्या पाठीशी उभा असलेला अजिंक्यतारा.. म्हैन्यातनं एकदातरी हाक मारून बोलवून घेनारं कास पठार.. आस्तीक असो नायतर नास्तिक, अस्सल सातारकर एकातरी श्रावनीसोमवारी यवतेश्वरला आनि दिवाळीत पयल्या अंघोळीला खिंडीतल्या गनपतीला जातोच.. कधीमधी सज्जनगडावर जाऊन तिथल्या महाप्रसादाची चव चाखतोच पावसाळ्यातल्या ठोसेघरपुढं स्काॅटलंड आन युरोप झक मारंल राजेहो !!