सातारा/अनिल वीर : येथील दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या चाप्टर यांच्यावतीने जिल्ह्यातील अनुसूचित वर्गातील उद्योजकांकरिता इंटरप्रनर डेव्हलपमेंट प्रोग्राम विषयी हॉटेल प्रीती एक्झिक्यूटिव्ह, सातारा येथे कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या वुमन विंगच्या राष्ट्रीय मार्गदर्शक श्रीमती सीमा कांबळे, वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट अविनाश जगताप,नॅशनल कॉर्डिनेटर डिक्की नेक्स्ट-जेन श्रीमती मैत्रेयी कांबळे, महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंट वूमन विंग श्रीमती निवेदिता कांबळे, सातारा चॅप्टर प्रमुख प्रसन्न भिसे, कोअर कमिटी सदस्य सचिन दिघोळकर, नॅशनल एससी-एसटी हब पुणे ऑफिसचे प्रमुख रितेश रंगारी, जिल्हा उद्योग केंद्र सातारा यांच्या प्रोजेक्ट ऑफिसर श्रीमती शितल पाटील आणि दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे सदस्य उपस्थित होते.
श्रीमती सीमा कांबळे म्हणाल्या, सन २००५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने कमिटी नियुक्त केली होती. कमिटीत १२ कॅबिनेट मंत्री,६ नामवंत तज्ज्ञ त्यामध्ये माजी कुलगुरू नरेंद्र जाधव, भन्ते राहुल बोधी, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह पंजाब व कन्नड भाषेतील साहित्यिक आदींचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून स्टार्ट अप इंडिया नावाने योजना आणली. ही योजना डीक्किची योजना असून डॉ. मिलिंद कांबळे यांनी कार्यान्वित केलेली योजना आहे. असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, “महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एखादे टपालचे तिकीट किंवा एखादे नाणे प्रकाशित केले जाते. परंतु, ज्याच्या डोक्यामध्ये समाजाचा विकासाचा विचार असतो. तो माणूस समाजाला विकसित करण्यासाठी योजना आणतो. देशातील सव्वा लाख बँकांमध्ये ही योजना लागू करण्यात आली.
या बँकांमधून समाजातील युवकांना उद्योगासाठी पतपुरवठा केला तर सव्वा लाख नवीन उद्योजक तयार होतील.” वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट अविनाश जगताप, कोर कमिटी सदस्य सचिन दिघोळकर यांनी त्यांनी स्थापन केलेल्या व्यवसायाविषयी माहिती सर्व उद्योजकांना सांगितली. त्यांनी व्यवसायाच्या सुरुवातीस आलेल्या समस्यांवर कसे निराकरण केले ? याबद्दलही माहिती दिली.डिक्की नेक्स्ट जेनच्या श्रीमती मैत्रेयी कांबळे यांनी तरुण नवउद्योजकांसाठी डिक्की नेक्स्ट जन कशा पद्धतीने प्लॅटफॉर्म तयार करते ? याबद्दलही संपूर्ण मार्गदर्शन केले.
तरुण पिढीने केलेले इनोव्हेशन तसेच प्रोजेक्ट त्या संदर्भात केंद्र सरकारकडून येणाऱ्या संधी व सवलती याबद्दलही त्यांनी पूर्ण माहिती सांगितली. एनएसआयसीचे प्रमुख रितेश रंगारी यांनी शासनाच्या विविध योजनांचे अनुदान, सवलती या बाबींची माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजक तसेच जिल्ह्याचे यशस्वी उद्योजक प्रसन्न भिसे यांनी सर्व नवउद्योजकांना केंद्र सरकार मार्फत मिळणाऱ्या योजना तसेच अनुदानासंदर्भात मोलाची माहिती समजावून सांगितली.ते पुढे म्हणाले, “एस.सी. कास्ट म्हणजे शेड्युल्ड कास्ट नसून स्पेशल कॅपॅबिलिटी असणारे लोक आहेत. नव उद्योजकांनी ही गोष्ट सकारात्मकरित्या घेऊन व्यवसाय सुरू करावा.व्यवसाय सुरू करत असताना बँक बाजारपेठेमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात केली पाहिजे. व्यवसाय निवडताना त्यामधील आवड तसेच त्यासंदर्भात असणारी सर्व माहिती घेऊनच व्यवसायामध्ये उतरल्यास कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.”
जिल्हा कॉर्डिनेटर प्रसन्न भिसे यांनी सूत्रसंचालन केले.याकामी, प्रशांत गवळी,शुभम लादे, बाळासाहेब अहिवळे, संघराज अहिवळे, सुमित वायदंडे आदींनी अथक असे परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमास सातारासह सांगली व पुणे जिल्ह्यातील सदस्यांनी व नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.