सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने होते.
प्रथमत: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार भन्ते दिंपकर,ऍड.विलास वहागावकर,शारदा लक्ष्मण घाडगे व भाऊ धाइंजे यांनी अर्पण करून अभिवादन केले.तद्नंतर ध्वजास मानवंदना देण्यात आली.सामुदायिक विधी भन्ते यांच्या अधिपत्याखाली पार पाडला.यावेळी प्रा.आबासाहेब उमाप,आबासाहेब दणाने, रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत खंडाईत,सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सचिव बी.एल.माने, डॉ.संदीप सूर्यवंशी आदींनी दिनाचे महत्व विशद केले. तुकाराम गायकवाड यांनी स्वागत केले.बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले.ऍड. विलास वहागावकर यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दल विभागाचे उपाध्यक्ष दिलीप फणसे,विविध क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.
बौद्ध धम्म ध्वज दिन- एक विश्व उत्सव स. १८८५ मध्ये श्रीलंकेत सर्वात प्रथम बौद्ध धम्म ध्वज फडकविण्यात आला होता.धम्म ध्वज दिन हा ध्वज श्रद्धा आणि शांततेचे प्रतिक म्हणून जगभरात स्वीकारला गेला.धम्म ध्वजाच्या रचनेबाबत अनेक मतांतरे दिसून येतात. अमेरिकेतील निवृत्त आर्मी कर्नल हेनरी स्टील वॉल्कॉट आणि जे.आर.डिसिल्वा यांनी श्रीलंकेमध्ये १८८० च्या मे महिन्यात धम्म ध्वजाची संकल्पना आणि संरचना मांडली होती.वॉल्कॉट यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्म चळवळ आणि बौद्ध शिक्षण पद्धतीचे मूलभूत कार्य सुरू केले होते.श्रीलंकेमध्ये त्यांनी बौद्ध धम्माचे शिक्षण देणाऱ्या ४०० शाळा आणि महाविद्यालयांची निर्मिती केली होती. त्यापैकी आनंदा, नालंदा, महिंदा आणि धर्मराजा या शिक्षणसंस्था मूलभूत मानल्या जातात.कोलंबो समितीची स्थापना १८८४ मध्ये बौद्धांनी ब्रिटिश शासकांकडून वैशाख/वेसक पौर्णिमा दिन हा बुद्ध जयंतीचा दिवस मे १८८५ पासून सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा करण्यास परवाना मिळवला. याचवेळी बौद्धांनी ‘कोलंबो समितीची’ स्थापना केली. या समितीचे प्रमुख वॉल्कॉट, लिटी आणि संघा हे होते. या समितीने २८ मे १८८५ रोजीच्या वैशाख पौर्णिमेरोजी धम्म ध्वज फडकवून पहिल्यांदा सार्वजनिक सुट्टी जाहीररित्या साजरी केली. दहा सदस्यीय कोलंबो समितीने हा ध्वज १७ एप्रिल १८८५ रोजी धम्मध्वज म्हणून समस्त जनतेसमोर आणला.१८८६ पासून वॉल्कॉट यांनी ध्वजामध्ये केलेल्या सुधारणेनुसार श्रीलंकेतील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये आणि इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकविण्याचे आवाहन केले.नंतरच्या काळात प्रा. जी. पी. मालालाशेखर यांनी परंपरेने संरचित केलेल्या ध्वजाचा प्रस्ताव मांडला होता.२५ मे १९५० रोजी कॅंडी येथे झालेल्या ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ बुद्धिस्ट’ च्या बैठकीत मांडला आणि बौद्धांचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले.आंतरराष्ट्रीय विश्व धम्म ध्वज
१९५२ मध्ये ‘वर्ल्ड बुद्धिस्ट काँग्रेसनेही’ या ध्वजाला ‘आंतरराष्ट्रीय विश्व धम्म ध्वज’ म्हणून मान्यता दिली.इ.स.१८८९ मध्ये सुधारित ध्वज सुरू करण्यात आला व अनागरिक धर्मपाल आणि कर्नल वॉल्कॉट यांनी तो म्यानमारच्या सम्राटाकडे सुपूर्द केला.इ. स. १९५२ मध्ये जागतिक बौद्ध परिषदेने हा ध्वज आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून स्वीकारला.पुढे इ.स.१९८५ मध्ये कोलंबो समितीने कोलंबो, श्रीलंका येथे ध्वजाची मूलत: रचना केली गेली. या समितीत पूज्य हिक्कादुवे, सुमंगल थेरा (अध्यक्ष), पूज्य मिगेत्त्तूवेत्ते, गुणानंद थेरो, डोनाल्ड डॉन, कारोलीस हेवावीथारणा,अंद्रीस बायर धम्मगुणवर्धना,चार्ल्स ए. डिसिल्वा, पीटर डी. अब्रेऊ, विलियम डि. अब्रेऊ, विलियम फर्नांडोसा, एन. एस. फर्नांडोसा आणि कार्लीस पूजिथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता.
विविध देशातील ध्वजांचे रंग,प्रकार सांप्रदायिक बौद्ध ध्वज जगातील वेगवेगळ्या भागातील विहारांमध्ये फडकतात.तथापी, अनेक देशातील बौद्धांची स्वतःच्या काही विशिष्ट शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगांमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. जपानी जुडो शिंशू ध्वजात केशरी रंगाऐवजी गुलाबी रंग आहे.थायलंडचा बौद्ध ध्वज पूर्णपणे मूळ बौद्ध ध्वज आहे. पण त्यात धम्मचक्र समाविष्ट केले आहे. नेपाळमधील तिबेटी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाऐवजी भुरकट रंग वापरण्यात आला आहे. म्यानमारमध्ये थेरवादी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाच्या स्थानावर गुलाबी रंगाचा उपयोग केला गेला आहे. हा रंग देशातील समस्त भिक्खूनींच्या वस्त्राचा रंग आहे. हे अधोरेखित करण्यासारखे आहे. थायलंडमध्ये थेरवादी बौद्ध लाल धम्मचक्र असणाऱ्या पिवळ्या बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात. अनेकदा आंतरराष्ट्रीय पंचशील बौद्ध ध्वजासोबत या ध्वजाची परेड केली जाते. गोशीमीकामाकु जपानी ध्वजात नारंगी रंगाऐवजी गडद निळ्या रंगाचा उपयोग झाला आहे.अशोकचक्र असलेला निळा भीम ध्वज भारतीय बौद्ध अनुयायांचा ध्वज आहे. हा ध्वज बहुतांशवेळा पंचशील ध्वजासोबतच फडकवला जातो, हा निळा बौद्ध ध्वज आंबेडकरी चळवळ आणि आंदोलनाचे प्रतीक मानले जाते. कोरियन बौद्ध पांढऱ्या बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात.ज्यात लाल रंगाचे स्वस्तिक आहे. याचा अर्थ स्वस्तिक हे बौद्ध परंपरेचे प्रतीक आहे.सोका गकाई तिरंगा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात. ज्यामध्ये निळा पिवळा आणि लाल रंग आहे.८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो.बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतिक असावे. यासाठी सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागरिक देवमित्त धम्मपाल, महास्थवीर गुणानंद सुमंगल,बौद्ध विद्वान जी.आर. डिसिल्वा इत्यादींनी मिळून निळा, पिवळा, लाल, पांढरा व केशरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ‘विश्व बौद्ध धम्म ध्वजाची’ निर्मिती केली. कालांतराने त्याला वैश्विक मान्यता प्राप्त झाली. या ध्वजाला पाली भाषेत ‘षडरोशनी ध्वज’ किंवा ‘धम्म ध्वज’ असे म्हणतात. ‘पंचशील ध्वज’ असेही संबोधले जाते.या ध्वजाचे आंतरराष्ट्रीय परिमाण/मोजमाप आडवा ७० सें.मी.आणि उभा ५० सें.मी. असे आहे.
निळा रंग- या रंगाचा भावार्थ समानता आणि व्यापकता असा आहे.अर्थात, या निळ्या आकाशाखाली सर्व प्राणी, जीवजंतू, पक्षी, व्यक्ती समान आहेत. तसेच हा रंग सार्वभौम करुणेचे प्रतिक आहे. सर्व प्राणीमात्रांप्रति कल्याणाची भावना ठेवण्याचा उपदेश हा रंग देत राहतो.पिवळा रंग- हा रंग तथागत बुद्धांनी दिलेला ‘मध्यम मार्ग’ सांगतो. मध्यम मार्गाच्या अवलंबासाठी ‘अष्टांगिक मार्गावरून’ चालण्याचा मार्ग तथागतांनी दिला आहे. या मार्गानेच उत्तम, चरित्रसंपन्न जीवन जगून निर्वाण प्राप्त करता येते. हाच प्रगतीचा सरळ आणि सुस्पष्ट मार्ग आहे याची शिकवण हा रंग देतो.लाल रंग- हा रंग जीवनातील सम्यक गतिशीलता आणि दृढ निश्चयाचे प्रतिक आहे. शक्तिमान, ऊर्जावान आणि कष्टाळू बनणे, प्रत्येक व्यक्तीने धम्माचरण करणे, जनकल्याणासाठी कठोर परिश्रम करणे तसेच धम्माच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी बलिदानही पत्करण्याची शिकवण हा रंग देतो. पांढरा रंग- या रंगाचा भावार्थ शांती आणि पवित्रता आहे. माणूस मन आणि कर्माने शुद्ध आणि पवित्र असावा. शीलवान आणि चरित्रसंपन्न व्यक्ती बनण्यासाठी शक्य तो प्रयत्न त्याने केला पाहिजे याची शिकवण हा रंग देतो. हा रंग तथागतांच्या विचारांची पवित्रता आणि शुद्धता याचे द्योतक आहे.
केशरी रंग- हा रंग त्याग, सेवा यांचे प्रतीक आहे. प्रज्ञा, बुद्धिवाद आणि उच्च विद्यांची प्राप्ती करणे, प्रत्येक व्यक्तीने उच्च शिक्षण घेतले पाहिजे, ज्ञानार्जन केले पाहिजे. शिक्षण घेणे ज्ञान प्राप्त करणे हे बुद्धधम्माचे मूलभूत तत्त्व आहे. मनाला सुसंस्कृत आणि नियंत्रित करण्यासाठी ज्ञानाची, शिक्षणाची आवश्यकता असते. ज्ञान मिळविल्याने व्यक्ती प्रज्ञावंत बनू शकतो आणि तो सेवा आणि त्यागासाठी तत्पर राहतो याची शिकवण केशरी रंग देतो. हा रंग तथागत बुद्धांच्या चिवर/काशाय वस्त्राचा रंग आहे जो शक्ती आणि धाडस दर्शवितो.ध्वजातील आडव्या पट्ट्यातील पाच रंग हे विश्वातील जैविक ऐक्याचे तर उभे पाच रंग हे विश्व शांततेचे प्रतीक मानले जाते. हा ध्वज बुद्ध धम्मातील परिपूर्णतेचे प्रतिक आहे. एकूणच हा ध्वज वंश, नागरिकत्व, वर्ग, जात, रंग, नानाविध परंपरा यांमधील भेद मानत नाही.