सातारा : सातारा शहराची स्थापना संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराजांनी केली. औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांचा अजिंक्यतारा किल्ल्यावर राज्याभिषेक झाला. याच किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली.
अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळूहळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एकेक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्याची ऊर्मी नव्याने जागृत केली. मराठा साम्राज्याला शाश्वत स्वरूप देण्याचा श्रीगणेशा केला. मराठा साम्राज्याचा चहूबाजूला जसजसा विस्तार होऊ लागला, तसतसा येथील किल्ल्याचा परिसर प्रशासनाला कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली.
सातारा शहराची अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांची नावे शाहू महाराजांच्या दूरदृष्टीची आठवण करून देतात. राजकीय महत्त्व संपले, तरीही मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहूनगरलाच सातारा असे म्हणतात. शाहू महाराजांनी स्वतःकरता दोन राजवाडे बांधले. यवतेश्वरच्या डोंगरातून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले.
त्यांनी शाहूनगरच्या वैभवात जास्तीतजास्त भर घालण्याचे प्रयत्न केले. शाहूनगरची रचना व प्रतिष्ठा शाहू महाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद, सुमेरगिरी, बन्सीपुरी अशा परराज्यातील सावकारांची वस्ती होणे सुरू झाले. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याचबरोबर शाहूनगरचे वैभवसुद्धा विस्तारले.
महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर वसवताना शाहू महाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पिलखाना, अदालतवाडा, बेगम मशिद अशा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.
छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी नवीन पेठांची निर्मिती केली. सातारा शहराची मुख्य वस्ती या विविध पेठांमध्ये वसली आहे. त्या पेठांचा थोडक्यात घेतलेला आढावा.
गडकर आळी : साताऱ्यातील सर्वांत जुन्या ठिकाणांचा उल्लेख करताना गडकर आळी हे नाव प्रथम घेतले जाते. साताऱ्याचा किल्ला (अजिंक्यतारा) ही मराठ्यांची चौथी राजधानी समजली जाई. येथे इसवी सन १७५० ते १८०० च्या कालखंडात गडावर देखरेख करणारे गडकरी ज्या ठिकाणी राहात, त्या वस्तीस गडकर आळी या नावाने ओळखले जाते. येथे लोकांच्या दहा ते वीस घरांची जुनी वस्ती आहे.
रविवार पेठ : गुरुवार पेठेच्या पूर्वेस सातारा शहराच्या सीमेवर ही पेठ वसविली गेली. या पेठेत महाराजांनी लोणार व कुंभार समाजातील लोकांना घरे बांधण्यासाठी जागा दिल्या. छत्रपती शाहू महाराजांनी या पेठेच्या माळावर लोकांना व घोड्यांना पाणी पिण्यासाठी दगडी रांजण पाण्याने भरून ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या भागास पोवईचा माळ (पाणपोईचा माळ) असे नाव पडले होते. त्यासच सध्या पोवई नाका म्हणतात. विकासाच्या दृष्टीने येथे ग्रेडसेपरेटरची निर्मितीही केली आहे.
सोमवार पेठ : शनिवार पेठ व यादोगोपाळ पेठेच्या मध्ये ही पेठ वसविली गेली. वाड्यांच्या बांधकामासाठी तेथील ओढ्याच्या काठावरून दगड काढण्यात आले. तेथे तळे निर्माण झाले. ते सतत वाहत असे. त्यास पूर्वी हमामपुरा तळे असे नाव होते. त्यासच पुढे फुटके तळे हे नाव पडले. या तळ्यातील पाणी सोमवार पेठेतील लोकांना वापरणे सोयीचे होते. त्यामुळे त्याच्या आसपास सामान्य लोकांनी वस्ती केली. त्या भागास सोमवार पेठ असे नाव दिले गेले. येथील पंचपाळी हौदही प्रसिद्ध आहे.
मंगळवार पेठ : छत्रपती शाहू महाराजांची राणी सगुणाबाई यांना मंगळवार तळ्याच्या उत्तरेस महाराजांनी वाडा बांधून दिला व तेथे बाग तयार करून दिली. त्या बागेस धनिणीची बाग असे नाव पडले, कारण सगुणाबाईंना धनीण या नावाने संबोधले जात असे.
बुधवार पेठ : शनिवार पेठेच्या उत्तरेस ही पेठ वसविली होती. या पेठेत शाहू महाराजांनी प्राणी संग्रहालय व अनेक ठिकाणांहून निरनिराळ्या प्रकारची झाडे आणून बाग तयार केली होती. त्याची व्यवस्था पाहणाऱ्या लोकांची वस्ती करण्यात आली होती. या बागेस बुधवार पेठ बाग असे नाव होते.
गुरुवार पेठ : ही पेठ अगदी सुरुवातीसच माची पेठेच्या उत्तरेस डोंगर उतारावर शाहू महाराजांनी वसविली व कितीतरी लोकांना कौल लावून जागा दिल्या. या पेठेच्या सुरुवातीस तख्ताचा वाडा बांधला होता. त्याच्या आसपास त्यांनी अनेक सरदार व अधिकाऱ्यांना वाडे बांधून दिले.
शुक्रवार पेठ : ही पेठ मंगळवार पेठेच्या नजीक आहे. या पेठेत छत्रपतींचे कारभारी, सेवक वगैरे लोक राहात असत. ही पेठ त्या वेळी सातारा शहराच्या उत्तर सीमेवर होती. या पेठेत खूप मोठी बांधीव, आखीव रेखीव विहीर बांधण्यात आली. त्या विहिरीस बाजीरावची विहीर म्हणतात.
माची पेठ : अजिंक्यतारा किल्ल्याच्या उत्तरेस पूर्व-पश्चिम अशी माची भागात ही पेठ वसविली गेली आहे. या पेठेतच रंगमहाल व अदालतवाडा ही निवासस्थाने स्वतःसाठी बांधली.
मेट : छत्रपती शाहू महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून अजिंक्यताराच्या तटाची व रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची जबाबदारी काही विशिष्ट लोकांवर होती. त्यावेळी किल्ल्याच्या तटाच्या डोंगर उतारावर रंगमहाल राजवाड्याच्या पूर्वेस त्यांची वस्ती केली. त्यास मेट असे नाव होते.
चिमणपुरा पेठ : शाहू महाराजांचे सरदार चिमणाजी दामोदर या खानदेशातील जहागिरदाराने आपला वाडा मंगळवार पेठेच्या पश्चिमेस बांधून ही पेठ वसविली. चिमणाजी दामोदर हे छत्रपती शाहू महाराजांचे राजज्ञ म्हणजेच खासगी चिटणीस व राजांच्या खासगी उत्पन्नाचे हिशेबनीस होते. त्यांच्या नावावरून या पेठेस चिमणपुरा पेठ हे नाव दिले गेले.
व्यंकटपुरा पेठ : सन १७३० मध्ये कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजे व छत्रपती शाहू महाराज यांच्यादरम्यान वारणेची लढाई झाली. त्या लढाईत इचलकरंजीचे व्यंकटराव घोरपडे यांचा पाडाव झाला. महाराजांनी चिमणपुरा पेठ व मंगळवार पेठेच्या शेजारी त्यांना वाडा बांधून सातारा येथे स्थायिक केले. त्या भागास व्यंकटपुरा पेठ हे नाव पडले.
यादोगोपाळ पेठ : वारणेच्या तहानंतर महाराणी ताराबाई साताऱ्यात राहण्यास आल्या. शाहू महाराजांनी त्यांची राहण्याची व्यवस्था अजिंक्यतारा किल्ल्यावरील वाड्यात केली व त्यांच्या मदतीला यादोगोपाळ खटावकर यास नेमून दिले. त्यांनी यादोगोपाळ पेठेची रचना केली व या पेठेत सचिवांचा वाडा व पिलखान्याची बांधणी करून दिली.
रामाचा गोट : मंगळवार पेठ व चिमणपुरा पेठेच्या मधोमध नागपूरच्या भोसले घराण्यातील रामाऊ भोसले या नावाच्या कर्तबगार स्त्रीने आपला वाडा बांधून सैन्य बाळगले होते. छत्रपती शाहू व नागपूरचे भोसले यांचे संबंध निकटचे होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना लढाईच्या वेळी मोठे सहकार्य केले होते. त्यामुळे त्या भागास रामाऊचा गोट असे नाव दिले गेले. ‘स्त्रीचा आदर करा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या,’ म्हणून स्त्रीवादी संघटना एकविसाव्या शतकात एकवटल्या असल्या, तरी छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यातील एका भागास कर्तबगार स्त्रीचे नाव बहाल करून आदर्श निर्माण केला होता. ‘रामाऊचा गोट’ असे नाव एका भागाला मिळाले आणि अपभ्रंशाने आज आपण ‘रामाचा गोट’ या नावाने या परिसरास ओळखतो.
केसरकर पेठ : शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांच्या खाण्यापिण्याची व शिक्षणाची व्यवस्था जोत्याजी केसरकर यांच्याकडे होती. त्यांच्या स्मरणार्थ रविवार पेठ व गुरुवार पेठेच्या मधील भागात शाहू महाराजांचे एकनिष्ठ सेवक म्हणून जोत्याजी केसरकर यांच्या नावाने ही पेठ वसविली.
रघुनाथपुरा पेठ : सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून शाहू महाराजांनी बुधवार पेठ व करंजे येथे जाणाऱ्या मधल्या जागेत आंब्याची बाग तयार केली होती. त्या बागांची व्यवस्था पाहण्यासाठी एका समाजाची वस्ती केली. त्या पेठेस थोरल्या बाजीरावांचा मुलगा रघुनाथ यांच्या नावावरून त्यास रघुनाथपुरा असे नाव प्राप्त झाले.
बसप्पा पेठ : बसप्पा नावाचा लिंगायत इसम शाहू महाराजांच्या कोठीवरील अधिकारी होता. तो खूप प्रामाणिक व विश्वासू होता. त्याच्या स्वामिनिष्ठेवर खुश होऊन शाहू महाराजांनी त्याला खूप पैसे बक्षीस दिले. त्या पैशातून त्याने शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी ही पेठ वसविली व तिला बसप्पा पेठ नाव दिले.
खणआळी : हा भाग बाजारपेठेचा आहे. येथे कापड दुकाने असून, खण मिळत असल्याने त्याला हे नाव प्रचलित झाले. सातारी पेढे खूप प्रसिद्ध आहेत.
सध्या प्रत्येक पेठेचा काळानुसार विकास होत गेला. मात्र, या पेठांना असणारी जुनी नावे आजही कायम आहेत. याठिकाणी असलेल्या अनेक इतिहासकालीन गोष्टी याची साक्ष देत आहेत.