कराड : माझ्यासमोर उमेदवार कोण आहे हेच मला माहीत नाही आणि माझी स्पर्धा कोणत्याही उमेदवाराशी नाही, तर तत्त्वांशी आहे. मी साताऱयात कोणालाही आव्हान देणार नाही. मी साताऱयाचा विकास आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढविण्याचा प्रयत्न करेन, असे सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
साताऱयातून उमेदवारी जाहीर होताच, शशिकांत शिंदे आज सातारला आले. जिह्याच्या सीमेवर सारोळा पुलावर कार्यकर्त्यांनी तुताऱयांचा गजर करत स्वागत केले. त्यानंतर सातारा शहरासह ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जिह्यातील स्वागतानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, शरद पवारांचा आदेश आल्यानंतर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. परिणामांचा विचार न करता सर्वसामान्यांना सोबत घेऊन ही निवडणूक मी लढणार आहे. लोकांना जो अपेक्षित बदल हवा आहे तो बदल देण्याचा मी प्रयत्न करीन. साताऱयाने कायम पुरोगामी विचारांची पाठराखण केली आहे. महाविकास आघाडी आणि जनतेच्या पाठिंब्यावर मी निवडणूक लढविणार आहे. सत्ताधाऱयांबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ती या निवडणुकीत मतदानातून बाहेर पडेल. साताऱयात प्रवेश करताना माझे सर्वस्तरातील लोकांनी स्वागत केले आहे. यामध्ये शेतकरी, तरुणांची संख्या ही मोठी आहे. हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या विचारांचे लोक माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि पुन्हा एकदा सातारा जिह्यात इतिहास घडेल, असा शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
माथाडींचे नेते नरेंद्र पाटील हे आपणास मदत करतील काय असे विचारले असता, शिंदे म्हणाले, मी कालच जाऊन अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी माझा सत्कार केला आहे. मात्र, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पक्षाचे काम करत असतो. मी त्यांना मदतीची साद घालीन, ते त्यांच्या पद्धतीने मला मदत करतील.
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन
सातारा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज शशिकांत शिंदे यांचे सातारा जिह्यात आगमन झाले. त्यावेळी जिह्याच्या सीमेपासून म्हणजेच नीरा नदीच्या पुलापासून कराडपर्यंत रॅलीने येऊन कृष्णा-कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील यांच्यासह जिह्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी कराड दौऱयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.