गोंदवले : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंदावले बुद्रुक येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे समाधीस्थळी त्रिपुरारी पौर्णिमा तसेच दिवाळीच्या सुट्टी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
समाधी मंदिरातील समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच समाधी मंदिर परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत होती. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशातून आलेल्या हजारो रामभक्तांनी येथे त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न केला. यानिमित्त सुरू असलेली भजन, प्रवचन, कीर्तन यालाही उपस्थिती लावून महाप्रसाद घेऊन रामनामामध्ये आपल्या घराकडे परतीचा प्रवास सुरू केला.