सातारा/अनिल वीर : येथील दुर्लक्षित असणाऱ्या साखरी तळ्यात झाडे – झुडपे वाढली आहेत.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आढळून येत आहे.
सातारा शहराच्या मध्यभागी असलेले जुन्या मोटार स्टॅन्ड जवळील ऐतिहासिक साखरी तळ्याला सध्या कचऱ्याचा विळखा पडला आहे . ये -जा करणारे नागरिक व भाजीपाला व्यवसायिक या तळ्यात कचरा टाकत असल्याने येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.प्रशासनाने याबाबत जागरूकता दाखवून हे तळे कचरा मुक्त व स्वच्छ करावे. अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.सध्या या तळ्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून तळ्यातील पाणी हे दूषित झाले आहे.त्यामुळे या ठिकाणी जीव जंतूचा फैलाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
साखरी तळे स्वच्छ करून तेथील पाण्याचा वापर व्हावा. अशी मागणी होत आहे.नगरपालिका शहराच्या विविध भागात ‘स्वच्छता अभियान ‘प्रभावीपणे राबवीत आहेत. साखरी तळ्याच्या बाबतही त्यांनी पुढाकार घेऊन हे तळे स्वच्छ करावे. ‘जल है तो कल है।’ हा शासनाच्या उपक्रमाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी .येथील परिसरात स्वच्छता बाबत प्रबोधनपर फलक व जनजागृती बाबत उपक्रम हाती घ्यावेत.स्वच्छ भारत अभियान यंत्रणा राबवणाऱ्या प्रशासनाने साखरी तळ्याची दखल घेऊन स्वच्छता बाबत पुढाकार घ्यावा. ऐतिहासिक व बांधीव तळ्याची निगा राखण्याबाबत नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे.