वाघोली महाविद्यालयात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धा दिमाख्यात संपन्न; स्पर्धेनिमित्त मैदानात चार महाराष्ट्र आणि दोन उपमहाराष्ट्र केसरीची हजेरी….
पिंपोडे बुद्रुक,:प्रतिनिधी
” विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाकडे लक्ष न देता जास्त वेळ मैदानावरही घालवला पाहिजे.चांगल्या आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. चांगले आरोग्य,चांगला खेळाडू निर्माण करते आणि खेळाडू राष्ट्राची ओळख ठरते “.असे विचार महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले. येथील शंकरराव जगताप आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वाघोली ता.कोरेगाव आयोजित शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भीमराव काका पाटील उपस्थित होते. ” ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा भरवणे अवघड काम आहे. परंतु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप जाधव आणि त्यांचे सर्व स्टाफ यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे.” असे गौरव उद्गार आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पाटील यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे क्रिडा अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ.शरद बनसोडे यांनी कुस्ती स्पर्धेचे केलेले नेटके नियोजन आणि मल्लांचा मिळालेला उदंड प्रतिसाद याचे कौतुक केले. खेळाडूंसाठी विद्यापीठ पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.
“शिवाजी विद्यापीठाने आंतर विभागीय स्पर्धा इतिहासात प्रथमच सातारा जिल्ह्यात आम्हाला पार पडण्याची संधी दिली ,याचा आम्हांला सार्थअभिमान आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी प्रथमच एका व्यासपीठावर चार महाराष्ट्र केसरी आणि दोन उपमहाराष्ट्र केसरी यांची उपस्थिती आमच्यासाठी आनंददायी आहे .पवित्र लाल मातीत चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व घडतात.असा आदर्श ठेवून आपली पुढील वाटचाल करा.” अशी अपेक्षा प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ.प्रताप जाधव यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र केसरी पै.बापू लोखंडे,पै.शिवाजी पाचपुते,पै.धनाजी फडतरे,पै.गोरख सरक ,तर उपमहाराष्ट्र केसरी पै.चंद्रकांत सुळ,पै.आबा सुळ, पै.निलेश लोखंडे,पै. दत्ता सूळ , प्रा. सुधीर वाटवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षा अँड.सुनीताताई जगताप,दत्तात्रय महाजन,चंद्रकांत वीरकर,सयाजी जाधव, प्रतापराव पवार, संजय महाजन, राजेंद्र कोरडे ,संभाजी धुमाळ, सुरेश काटकर कार्यक्रमास उपस्थित होते. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील१८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच संभाजी वरुटे ,संभाजी पाटील,बाजीराव पाटील, जितू कणसे राजेंद्र कणसे ,अमोल साठे हे स्पर्धा पार पाडण्यासाठी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रा.प्रताप पवार, सूत्रसंचालन प्रा.डॉ. विपीन वैराट यांनी केले तर प्रा. डॉ.जयपाल सावंत यांनी आभार मानले.स्पर्धा यशस्वीतेसाठी वाघोली महाविद्यालयाच्या टीमने, खेळाडूंनी परिश्रम घेतले.