दर्शनासाठी भक्तांनी केली अलोट गर्दी
विजय ढालपे,गोंदवले – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा चिंचवडच्या प्रशांत कुलकर्णी, यांच्या प्रतिभेचा हा प्रकट अविष्कार ‘श्रींचे’ चरणी समर्पित केली आहे आणि ती भक्तांचे आकर्षण ठरली. सुपारीच्या झाडाच्या फांद्या पासून (वीरी) भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्रावळी तयार केल्या जातात. त्या नैसर्गिकरित्या विविध रंगछटांमध्ये उपलब्ध असतात. यंदाच्या गुरुपौर्णिमेला गोंदवल्यात श्रीमहाराजांचा प्रसाद अशाच पत्रावळीतून दिला गेला.
या पत्रावळींच्या विविध आकाराच्या चकत्या कापून, त्यांचा आकार व त्यांची रंगसंगती याचा कल्पकतेने वापर करून श्री महाराजांची सुंदर व सजीव प्रतिमा साकारली. श्री महाराजांच्या गळ्यातील जप माळ ओल्या सुपाऱ्यांपासून बनविल्या आहेत. पूर्ण ब्रह्म अन्न, ज्या पात्रातून आपल्याला प्राप्त होते, त्या पात्रांनीच महाराजांच्या व्यक्तीमत्वाचा आकार धारण केला आहे. श्री महाराज जसे ‘नामात’ आहेत, तसेच ते ‘अन्नदानात’ ही आहेत, हाच संदेश, ही कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचविते.