सुभाषबाबू याचे ऐकले असते तर स्वातंत्र्यासाठी एव्हढी वाट पाहावी लागली नसती! आतातरी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या !

0
फोटो : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.

सातारा :-भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती.त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या महायुद्धात भारताने जर इंग्रज विरोधातील देशाबरोबर भारताने लढले असते तर आपसूकच स्वातंत्र्य मिळाले असते.असे विचार राज्यस्तरीय नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्कार विजेते अनिल वीर यांनी व्यक्त केली. 

     आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष ऍड. विलास वहागावकर होते.तेव्हा वीर बोलत होते.यावेळी गणेश येवले,शुभम शिंदे,सुशांत यादव,सुभाष कुंभार,गणेश खुडे,अजय बडेकर, राहुल कांबळे, हर्ष सोनवणे, आयुष् सावंत,अथर्व जाधव, स्वराज वेंदे,यमुना ढेकणे,शितल खोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

              “१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांच्याशी चर्चा करताना म. गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता.वयाच्या १५ व्या वर्षी सुभाषबाबू गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून सुभाषबाबू  त्यांचे शिष्य बनले.महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत होती. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता. १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले. ज्येष्ठ दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले.तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. १९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्याच्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू यांना पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल. २६ जानेवारी१९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले होते.भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले होते.१९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.१९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. १९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले.या अधिवेशनासाठी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१ वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले होते. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला होता. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली होती.याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत योग्य दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती.१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती. जी या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण त्यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांनी पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली होती.याशिवाय, प्रफुल्लचंद्र राय व मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे.या मताचे होते. 

शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे अनेक वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.पट्टाभि सितारामैय्या यांना काहींनी साथ दिली होती. तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण, घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली  होती.तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली होती. १९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते. की, त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले होते.३ मे १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध  सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले होते. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा ।”  असा नारा सुभाषबाबू यांचा अजरामर ठरला. दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.दि. १८.०८.१९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले.तदनंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. दि. २३. ०८ . १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते. त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली होती.परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला.१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की, १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की, नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा नाही.१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे. १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.काहीही असो.मात्र,एवढ्या वर्षांनंतर नक्कीच त्यांचे निधन झाले असणारच आहे.तेव्हा त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा.अशीही मागणी नेतार्जीप्रेमी करीत आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here