वडूज : खटाव तालुक्यातील वडूज एस. टी. बसस्थानकातील स्वच्छतागृहाच्या वापरासाठी महिला व विद्यार्थिनींकडून पैसे घेऊन नका; अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष वडूज आगारात जाऊन अधिकार्यांना लेखी निवेदन दिले आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृह वापरण्यासाठी विद्यार्थिनी व महिलांकडून पैसे आकारले जात असल्याची तक्रार या महिलांनी केली आहे.
यावेळी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, तालुकाध्यक्ष डॉ. प्रियांका माने, प्रमिला पाटोळे, सुनीता जाधव, ऋत्विका पाटोळे, रुपाली देशमुख आदींसह महिला उपस्थित होत्या.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, वडूज येथील बसस्थानकातील स्वच्छतागृह वापरण्यासाठी विद्यार्थिनी व महिलांकडून पैसे आकारले जात आहेत. दुष्काळी आणि ग्रामीण भागातील महिला व विद्यार्थिनींसाठी हे अन्यायकारक आहे. हा प्रकार त्वरित थांबवा, नाही तर या विरोधात संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. प्रा. म्हेत्रे, डॉ. माने यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थिनी व महिलांबाबत घडत असलेला प्रकार अत्यंत निषेधार्ह असून याबाबत तातडीने निर्णय घेवून हा प्रकार थांबवा, अन्यथा याबाबत महिला आयोगाकडे न्याय मागण्याबाबत प्रक्रिया करण्याचा इशाराही त्यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी दिला.