सातारा/अनिल वीर : लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांनी स्वातंत्र्य, समता,न्याय व बंधुत्वाचे मूल्य तळागाळात पोहचविण्याचे काम केले होते.तेव्हा समाजातील सर्व घटकांनी शाहिरांच्या विचारांवर वाटचाल करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन डॉ.प्रा. विलास खंडाईत यांनी केले.
येथील कामाठीपुरातील संत गाडगेमहाराज सभागृहात महाराष्ट्रातील थोर सत्यशोधक लोकशाहीर तथा फुले-शाहु-आंबेडकरी विचारांचे प्रचारक महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा प्रमुख वक्ते म्हणुन डॉ.विलास खंडाईत मार्गदर्शन करीत होते.यावेळी निवृत्त उपविभागीय पोलिसाधिकारी विवेक लावंड,जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, रमेश इंजे,सुनीता फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.खंडाईत म्हणाले,”समाजात असणारी अंधश्रद्धा,व्यसनाधीनता,अघोरी प्रथा,उच्च निचता यावर प्रहार करीत शाहिरांनी समाजप्रबोधनाचे कार्य केलेले आहे.”
प्रारंभी लोककलावंतांनी कला सादर करून अभिवादन केले. मान्यवरांनीही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.डॉ. खंडाईत यांच्यासह सौ.भाग्यश्री फरांदे,रमेश इंजे आदींनी मनोगत व्यक्त केली.वैभव फरांदे यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,कलावंत,कार्यकर्ते उपस्थित होते.