खंडाळा : अवैध सिलिंडरचा साठा करून वाणिज्य व व्यावसायिक विक्री करणाऱ्यांवर मंगळवारी (ता. ८) मुंबई येथील राज्यस्तरीय पुरवठा दक्षता पथकाने कारवाई केली. सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील खंबाटकी घाटानजीकच्या बंद पडलेल्या ढाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली असून, पथकाने ८० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे; तर दोघांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा विभागाचे संचालक सुधाकर तेलंग यांना गुप्त माहितीच्या आधारे गॅस सिलिंडरचा अवैध व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सुधाकर तेलंग यांनी उपनियंत्रक गणेश बेल्लाळे व सहाय्यक नियंत्रक विनायक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बनवून सातारा येथे पाठवले. मुंबई याथील हे दक्षता पथक गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पाळत ठेवून होते.
मंगळवारी पुणे-सातारा महामार्गावरील खंडाळा येथे खंबाटकी घाटाजवळ बंद पडलेल्या गुरुनानक पंजाबी ढाब्यावर दोन दिवसांपासून पथक दबा धरून बसले होते. त्यांनी योग्य वेळ साधून गॅस टँकरमधून अवैधपणे गॅस चोरी करून ते वाणिज्यिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरताना मोहम्मद तौफिक व हरीओम सिंग या दोघांना अटक केली असून, चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. देवराज जानी याचा हा अवैध व्यवसायाचा अड्डा असून, त्याच्यासह आणखी चार आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. या कारवाईत दोन गॅस टँकर, दोन टेम्पो, २०० सिलिंडर व चोरी करण्याचे साहित्य, असा एकूण ८० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करून खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.