थोरात गटाच्या पुढार्‍यांना आत्मचिंतनाची गरज ; थोरात साहेब आता हिशोब मागण्याची वेळ आली..!

0

संगमनेर :

रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीच्या मतदानानंतर मंगळवारी झालेल्या मतमोजणीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात समर्थकांनी ३७ ग्रामपंचायती पैकी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीत मुसंडी मारून आपापले गड शाबित ठेवले असले तरी या निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील चार आणि तालुक्यात असणाऱ्या मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सात ग्रामपंचायतींचे गड काबीज करण्यात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्थानिक पुढारी सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तब्बल ११ ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे ढासळलेले बुरुज पूर्ववत करण्याची तसदी यापुढील काळात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना घ्यावीच लागणार आहे. कुठे घडले, कुठे बिघडले याचा हिशोब आता स्थानिक गाव पुढाऱ्यांकडून घेऊन त्यांचे कान उपटण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे. 

             मंगळवारी झालेल्या ३७ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत तालुक्यातील तब्बल २६ ग्रामपंचायतीवर थोरात समर्थक शिलेदारांनी आपापले गड राखत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीमागे आपली भक्कम ताकद उभी केली आहे, ही गोष्ट नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. मात्र यातील बहुसंख्य ठिकाणी थोरात समर्थक दोन गटातच लढती झाल्या होत्या हे लक्षात घ्यायला हवे. खरी लढाई तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गावात आणि गावा शेजारच्या शिवावरील गावात  पाहायला मिळाली, तेथे थोरात समर्थक पुढार्‍यांना विखे समर्थक पुढाऱ्यांनी धूळ चारत सन्मान जनक विजय खेचून आणला. ही बाब माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. यातील काही ग्रामपंचायतीत थोरात गटाचे सदस्य निवडून आले असले तरी थेट जनतेतून निवडला जाणारा सरपंच विरोधी विखे गटाचा निवडून आल्याने हा थोरात गटाला मोठा हादरा मानला जात आहे. कारण प्रभागातील मतदार मोजके असतात, मात्र सरपंच पदाच्या उमेदवाराला मतदान करणारे संपूर्ण गावातील मतदार आसतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे हक्काची असणारी ही गावे हातातून का गेली ? याचे आत्मपरीक्षण थोरात समर्थक पुढाऱ्यांना करावे लागणार आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या व तालुक्याच्या महत्त्वाच्या गावापैकी एक असणाऱ्या शहरा जवळील घुलेवाडीत थोरात समर्थक दोन्ही गटांना धूळ चाळत घुलेवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सोपानराव राऊत यांनी पहिला हादरा दिला, त्यांनी तिथे परिवर्तन घडवित आपल्या भावाच्या सुनबाईं निर्मला कैलास राऊत यांना एकाकी खिंड लढवीत सरपंचपदी निवडून आणले. भलेही प्रभागातील इतर उमेदवारांना त्यांना निवडून आणता आले नसले तरी संपूर्ण गावाच्या मतदानातून त्यांनी हे यश खेचून आणले ही घुलेवाडीतील थोरात समर्थक स्थानिक पुढार्‍यांची चिंता वाढवणारी गोष्ट आहे. तळेगाव दिघे येथे थोरात समर्थक गाव पुढाऱ्यांच्या हातात असणारी ग्रामपंचायतची सत्ता विखे समर्थक पुढाऱ्यांनी खेचून आणली या ठिकाणी विखे गटाच्या उषा रमेश दिघे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. निमोण मध्ये संदीप भास्करराव देशमुख या तगड्या पोराने आत्मविश्वासाच्या बळावर बलाढ्य थोरात गटापुढे आव्हान उभे करत दुसऱ्यांदा निमोण ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. सायखिंडी ग्रामपंचायत निवडणुकीत नीलम पारधी या बिनविरोध सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या गटाच्या हा संभ्रम कायम असताना त्यांनी भाजपला जवळ केले असून भाजपा तालुका अध्यक्ष सतीश कानवडे यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आल्याने त्या कोणत्या गटाच्या हे स्पष्ट झाले आहे. वरील चारही ग्रामपंचायती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात येतात. त्याचबरोबर तालुक्यात असणाऱ्या मात्र शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या व खुद्द माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे मूळ गाव असणाऱ्या जोर्वेत विखे समर्थक माजी उपसरपंच गोकुळ दिघे या पोराने थोरात समर्थक गाव पुढार्‍यांना धडा शिकवत येथील सत्ता अबाधित राखण्यात यश मिळवले आहे. येथे गोकुळ दिघे यांच्या पत्नी प्रीती गोकुळ दिघे या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून विराजमान झाल्या आहेत. जोवेॅ शेजारी असणाऱ्या कोल्हेवाडीत विखे समर्थक राहुल भास्करराव दिघे यांनी थोरात गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराजित करत त्यांच्या पत्नी सुवर्णा राहुल दिघे यांना सरपंचपदी निवडून आणले आणि तिथे असणारी थोरात समर्थक गाव पुढाऱ्यांची सत्ता उलथवून टाकली आहे. रहिमपुरातही थोरात समर्थक पुढाऱ्यांच्या सत्तेला सुरुंग लावत विखे गटाच्या सविता लक्ष्मण शिंदे सरपंचपदी निवडून आल्या आहेत.कनकापूर येथे ज्योती पचपिंड, निंबाळेत भागीरथीबाई काठे, मालुंजेत सुवर्णा संदीप घुगे, सादतपूर नारायण गुंजाळ हे विखे पाटील गटाचे शिलेदार थोरात गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारांना चितपट करून सरपंचपदी विराजमान झाले आहेत. हे सर्व निकाल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. आपला प्रभाव असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या गावांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दबाव राहावा या दृष्टीने ही गावे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना हवी होती, मात्र तसे घडले नाही. भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची चिंता  विखे पाटील यांना आता राहिली नाही ते अगदी निश्चिंतपणे या निवडणुकांना सामोरे जातील अशी परिस्थिती निर्माण झाली असून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची चिंता मात्र वाढली आहे.त्यासाठी कुठे घडले, कुठे बिघडले याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ थोरात समर्थक पुढाऱ्यांवर आली आहे. तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवता आली असली तरी  या  विजयावर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीत मोठ्या फरकाने विजयी झालेल्या विखे समर्थक सरपंच आणि घुलेवाडीच्या परिवर्तन पॅनलच्या सरपंचाच्या विजयाने विरजण पडले आहे. त्यामुळे हक्काच्या या ग्रामपंचायती कशा गेल्या याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ थोरात समर्थक गाव पुढार्‍यांवर आली आहे. त्यासाठी थोरात साहेब, आता तुम्हालाच वैयक्तिक लक्ष घालून गाव पातळीवरील बिघडलेले हे समीकरण दुरुस्त करावे लागेल. आपण गावांवर लादलेल्या स्थानिक गाव पुढार्‍यांचा त्यांच्या त्यांच्या गावात, जनमानसात किती प्रभाव आहे, किती लोक त्यांचे नेतृत्व मानतात, याचा विचार करावाच लागणार आहे. काल झालेली या नऊ गावातील निवडणूक ही केवळ ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है, मोठी लढाई तोंडावर आहे. गाव पातळीवर झालेल्या या निवडणुकांचा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नक्कीच परिणाम दिसू शकतो. तत्पूर्वी ढासळलेले हे बुरुज पुन्हा उभे करण्याची तसदी घ्यावीच लागणार आहे. आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली असून  स्थानिक कार्यकर्त्यांवर अपयशाचे खापर फोडून चालणार नाही तर स्थानिक पुढाऱ्यांकडून काय काय चुका झाल्या याचा हिशोब मागण्याची वेळ आता आली आहे. हा हिशोब घेतला नाही तर थोरात साहेब, येणाऱ्या पुढील निवडणुकात आपल्या हक्काच्या गट आणि गणात धक्कादायक निकाल लागू शकतात अशी सोय आपल्याच  घरभेद्यांनी स्थानिक पातळीवर या निवडणुकांच्या माध्यमातून करून ठेवली आहे. निवडणुका म्हटल्या  की जय पराजय आलाच, पण पराभवाची कारणे जे शोधतात, त्यावर इलाज करतात तेच भावी काळात येणाऱ्या निवडणुकात विजय संपादन करू शकतात हे समीकरण आहे. संगमनेर तालुक्यावर राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, असे असताना संगमनेर विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दिघे, निमोण, सायखिंडी या मोठ्या गावात तर शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या तालुक्यातील जोर्वे, कोल्हेवाडी, रहिमपूर, मालुंजे, निंबाळे, कनकापूर, सादतपूर या गावात विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे आणि घुलेवाडीत स्वतंत्र गटाचा सरपंच थेट जनतेतून निवडून येणे ही आमदार बाळासाहेब थोरात यांच्या दृष्टीने मोठी चिंतेची बाब आहे.  वरील गावातील हे शिलेदार थोरात गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारांना चितपट करतील असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र हे घडले आहे, हे का घडले ? याचा हिशोब थोरात साहेब, आपण वेळ काढून स्थानिक पुढाऱ्यांकडून घ्यायलाच हवा. आपण जनतेवर लादलेले हे स्थानिक पुढारी त्या पात्रतेचे आहेत का ? याचे निरीक्षण, परीक्षण आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आली आहे. थोरात साहेब तुमच्याबद्दल कोणाचीही नाराजी नाही, मात्र आपलेे स्थानिक पुढारी कोणालाही जुमानत नसल्याच्या असंख्य्य तक्रारी आहेत. त्यांनी गावागावात केलेला तथाकथित विकास लोकांना भिंगाचा चष्मा लावून सुद्धा दिसत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींची सत्ता असताना आपल्या स्थानिक पुढाऱ्यांनी गांवाचा काय विकास साधला हेे पाहण्याची तसदी एकदा घ्याच, यासाठी स्थानिक कर्तुत्व शून्य पुढाऱ्यांना बाजूला ठेवून तुमच्यावर मनोमन निष्ठा असणाऱ्या प्रत्येक गावातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवा व त्यांचे ऐकून घ्या, एवढीच माफक अपेक्षा. कारण हा केवळ ट्रेलर होता. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा पिक्चर अजून बाकी आहे हे लक्षात असू द्या. तत्पूर्वी बिघडलेल्या या गोष्टी सुरळीत कराव्या लागतील हे नक्की. नाहीतर भविष्यात अनेक धक्कादायक निकाल या भागातून कानावर येथील हेे नक्की.

(संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक विश्लेषण – चंद्रकांत शिंदे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here