संगमनेर : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली असून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. माजी महसूल मंत्री व काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून दुसऱ्या यादीत ७४१६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून लवकरच या सर्व शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात व तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विनाअट सरसकट दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. तत्कालीन महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा या निर्णयात मोठा पुढाकार होता. त्यामुळे राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ झाला. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे, अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रिमंडळाने घेतला होता.
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातत्याने कर्ज वसुली दिली आहे यावर्षीही कर्ज वसुलीची जिल्हा बँकेची परंपरा जपताना ९९.८०% कर्ज वसुली दिली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरीता आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यामुळे दुसऱ्या यादीत तालुक्यातील ७४१६ खात्यांची यादी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीचे जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमधील आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपयांचे अनुदान जमा होणार आहे.यामुळे संगमनेर तालुक्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व शेतकरी बांधवांनी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.